नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात पैशाच्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:03 AM2018-05-06T00:03:20+5:302018-05-06T00:03:43+5:30
व्याजाने घेतलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या तरुणाला ‘बर्थ डे पार्टी’चे निमित्त सांगून बोलावण्यात आले. पण पार्टी न करताच त्याच्याशी भांडण उकरून काढत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला शाळेच्या स्वच्छतागृहात बंद करून आरोपींनी पळ काढला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्याजाने घेतलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या तरुणाला ‘बर्थ डे पार्टी’चे निमित्त सांगून बोलावण्यात आले. पण पार्टी न करताच त्याच्याशी भांडण उकरून काढत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला शाळेच्या स्वच्छतागृहात बंद करून आरोपींनी पळ काढला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी येथे शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
नंदकिशोर दिनेश भोसले (२१, रा. गोंडखैरी बरड, ता. कळमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव असून, आरोपींमध्ये प्रताप ऊर्फ चुन्नी, अश्विन रामकृष्ण मारवाडी व बाल्या तिघेही रा. गोंडखैरी (बरड), ता. कळमेश्वर या तिघांचा समावेश आहे. प्रतापने नंदकिशोरकडून वर्षभरापूर्वी १७ हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. नंदकिशोरने काही दिवसांपासून प्रतापकडे या रकमेची मागणी केली होती. प्रतापला रक्कम परत करण्याची इच्छा नसल्याने त्याने नंदकिशोरचा काटा काढण्याची योजना आखली.
या चौघांपैकी कुणाचाही शुक्रवारी वाढदिवस नसताना प्रतापने नंदकिशोरला रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास ‘बर्थ डे पार्टी’साठी गोंडखैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर बोलावले. तो शाळेच्या मैदानावर पोहोचताच तिघांनीही त्याच्याशी भांडण उकरून काढत मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय, तिघांनीही त्याच्या डोके, पोट, पाठ व कानशीलावर धारदार शस्त्राने वार केले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने शाळेच्या स्वच्छतागृहात नेला आणि तिघांनीही पळ काढला.
नंदकिशोर रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याचा शोध घेतला. सकाळी त्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात आढळून येताच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी नेहा दिनेश भोसले (१८) हिच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भादंवि ३०२, २०१, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदविला या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.
शोधपथक रवाना
नंदकिशोरच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी दोन शोधपथक तयार करण्यात आले असून, ते रवाना करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी दिली. आरोपींची संख्या तीनपेक्षा अधिक असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीने सांगितलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी पोलिसांना काहीही आढळून आले नाही. त्यामुळे तिथे पार्टीचे आयोजन करण्यात आले नसल्याचेही स्पष्ट होते. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.