युग चांडकच्या मारेकऱ्यांना आजन्म कारावास : फाशीची शिक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 09:03 PM2020-04-24T21:03:41+5:302020-04-24T23:26:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. तसेच, आरोपींना मरेपर्यंत कारागृहात ठेवण्यात यावे आणि त्यांना २५ वर्षे कारावास भोगल्याशिवाय शिक्षामाफी देण्यात येऊ नये असे निर्णयात स्पष्ट करून शिक्षेची कठोरता वाढवली.
न्या. उदय ललित, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. हेमंत गुप्ता यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (खून) अंतर्गत मरेपर्यंत फाशी आणि कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. ५ मे २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसा कायम ठेवला होता. त्यामुळे आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची फाशी रद्द केली असली तरी, त्यांना या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडकतर्फे अॅड. राजेंद्र डागा व अॅड. राहील मिर्झा तर, आरोपींतर्फे अॅड. युग चौधरी व अॅड. अजितसिंग पुंदीर यांनी कामकाज पाहिले.
सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम निरीक्षण
कोणतेही परिश्रम न घेता झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आरोपींनी युगचे अपहरण केले व खंडणी मागितली. तसेच, प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर युगचा निर्घृण खून केला. परंतु, कायद्यानुसार आरोपींना दूर्मिळातल्या दूर्मिळ घटनेतच फाशीची शिक्षा सुनावता येते आणि ही घटना या निकषात बसण्यामध्ये थोडक्यात कमी पडते असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय देताना नोंदवले.
असे आहे प्रकरण
आरोपी राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट तर, अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. तो रुग्णालयात हेराफेरी करीत होता. रुग्णांना अतिरिक्त पैसे मागत होता. त्याच्या तक्रारी डॉ. चांडक यांना मिळाल्या होत्या. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. त्यालाही राजेशची हेराफेरी दिसून आली होती. त्यावरून एक दिवस राजेशने युगला थापड मारली होती. डॉ. चांडक यांनी राजेशचे हे कारनामे पाहून त्याला फटकारले होते आणि कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात होता. त्यातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगचे अपहरण करून त्याला दुचाकीने कोराडी रोडवरील निर्जण ठिकाणी नेले. त्यानंतर डॉ. चांडक यांना मोहसीन खान नावाने दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी व दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली. तेव्हापर्यंत डॉ. चांडक यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात युग हरविल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी चक्रे फिरवली होती. दरम्यान, आरोपींनी घाबरून युगचा निर्घृण खून केला.
निर्णयावर समाधानी नाही
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधानी नाही. आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची अपेक्षा होती. यासाठी पुढे काय करायचे यावर वकिलांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
- डॉ. मुकेश चांडक, युगचे वडील.