बनावट रेल नीर विकताना युवकास अटक
By admin | Published: September 22, 2016 03:02 AM2016-09-22T03:02:36+5:302016-09-22T03:02:36+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सदर येथील रहिवासी अमित अनिल अधिकारी (२१) यास रेल्वेस्थानकावर बनावट रेल
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सदर येथील रहिवासी अमित अनिल अधिकारी (२१) यास रेल्वेस्थानकावर बनावट रेल नीरच्या पाण्याच्या बाटल्या विकताना रंगेहाथ अटक केली. त्याच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अमित नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक २ वर आलेल्या गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना बनावट रेल नीरच्या बाटल्या विकत होता. रेल्वेगाड्यात प्रवास करणारे प्रवासी तहान लागल्यानंतर प्लॅटफार्मवर उतरून नळातून बाटलीत पाणी भरतात. परंतु अनेक प्रवासी नळाचे पाणी न घेता बाटलीबंद पाणी विकत घेतात.
रेल्वेगाडी अतिशय कमी वेळ प्लॅटफार्मवर उभी राहत असल्यामुळे प्रवासी त्यांना मिळालेली पाण्याची बाटली ब्रॅण्डेड आहे की नाही याची पाहणी करू शकत नाहीत. याच बाबीचा फायदा घेत प्रवाशांना रेल नीरची बनावट बाटली विकण्यात येते. हा प्रकार नागपूर रेल्वेस्थानकावर मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार उजेडात आला आहे. आता रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे याबाबत काय कारवाई करण्यात येते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)