तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवासेना, संघ स्वयंसेवकही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:19 PM2020-08-29T12:19:38+5:302020-08-29T12:22:37+5:30
भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर उपराजधानीतील नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ शहरात निदर्शने झाली. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानादेखील नागपुरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याची बातमी एखाद्या वणव्यासारखी नागपूरकरांमध्ये पसरली आणि नागरिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आम आदमी पक्षासह युवासेनेचे पदाधिकारीही मुंढे यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.
‘आप’चे कार्यकर्ते पावसातदेखील आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर युवासेनेतर्फे चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून जर मुंढे यांची बदली रद्द झाली नाही तर जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुंढे यांची बदली झाल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी संघाच्या स्वयंसेवकांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घाणेरड्या राजकारणातूनच मुंढे यांची बदली झाल्याची भावना अनेक संघ स्वयंसेवकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून बोलून दाखविली आहे.
मुंढे यांनी नागपुरात खरोखरच चांगले कार्य केले. ‘कोरोना’च्या काळात त्यांनी केलेले नियोजन हे दूरदृष्टी दाखविणारे होते. त्यांची अचानक झालेली बदली ही नागपूरसाठीदेखील नकारात्मक बाब आहे, असे मत संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
‘सोशल मीडिया’वर निघतेय ‘भडास’
‘सोशल मीडिया’वर मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहीमच सुरू झाली. ‘फेबुक’वर ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ यासारखे विविध ‘पेजेस’ तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. काही नागरिकांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहीमदेखील राबविली आहे.