नागपूर जि.प. शाळांचे होणार ‘ऑडिट’; ‘लोकमत’च्या लढ्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:30 AM2019-07-01T10:30:54+5:302019-07-01T10:31:18+5:30
जिल्हा परिषद शाळेच्या दूरवस्थेसंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद शाळेच्या दूरवस्थेसंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. शाळांमध्ये भौतिक सुविधा परिपूर्ण नसल्याने आकस्मिक घटना घडू नये म्हणून शाळेच्या इमारती, वीजपुरवठा व इतर भौतिक सुविधाबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. शेकडो जि.प.च्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. मोठ्या संख्येने वर्गखोल्या नादुरुस्त आहे. कुठे छत गळत आहे, तर कुठे भिंतीला भेगा पडल्या आहे. अनेक शाळेच्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून धोकादायक असतानाही वर्ग भरविण्यात येत आहे.
काही शाळेच्या छतावरून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत. शाळा परिसरात स्वच्छता ठेवण्यात येते काय? विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते काय? शाळेला सुरक्षा भिंत आहे काय?, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या खोलीची स्वच्छता होते काय? आहाराचा दर्जा, शुध्दता व चव आदीची तपासणी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिेले आहेत.
पथकाद्वारे होणार तपासणी
समग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या तीन अधिकाºयांच्या पथकाव्दारे जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळांचे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्यात येणार आहे. हे आॅडिट शंभर टक्के शाळांना भेटीच्या माध्यमातून करण्याचे निर्देश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिले आहे.