रात्री झमाझम, दिवसाही ढगांचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 09:34 PM2022-09-22T21:34:11+5:302022-09-22T21:34:35+5:30
Nagpur News सप्टेंबरमध्ये पावसाचा वेगळा खेळ नागपूरसह विदर्भवासी अनुभवत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची रिपरिप चालली असते; पण रात्री मात्र मेघांची बरसात हाेते.
नागपूर : सप्टेंबरमध्ये पावसाचा वेगळा खेळ नागपूरसह विदर्भवासी अनुभवत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची रिपरिप चालली असते; पण रात्री मात्र मेघांची बरसात हाेते. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस शांत राहिला.
नागपुरात सकाळपर्यंत १५.१ मि.मी. पावसाची नाेंद झाली; पण दिवसभर उघाड हाेता. दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत गडचिराेली आणि गाेंदियाला झाेडपून काढणाऱ्या पावसाने त्यानंतर थाेडी उसंत घेत दिलासा दिला. मात्र, मंगळवारी या दाेन जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. गाेंदिया शहराला पाण्याचा वेढा पडला हाेता. शेतीचेही अताेनात नुकसान झाल्याने लाेक हवालदिल झाले आहेत. बुधवारी रात्री हलका पाऊस झाला. गुरुवारी मात्र तिन्ही जिल्ह्यांसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस शांत हाेता. वर्ध्यात ४ मि.मी.ची नाेंद वगळता उल्लेखनीय पाऊस झाला नाही. रात्री मात्र वातावरण तयार झाले हाेते.
तापमान घसरले,आर्द्रता वाढली
पावसाळी ढगांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. सकाळी नागपूर, वर्धा, गाेंदिया, गडचिराेली, अमरावतीत ९५ ते ९९ टक्के आर्द्रता हाेती. सायंकाळी मात्र गाेंदिया वगळता इतर जिल्ह्यांची आर्द्रता कमी झाली. पावसामुळे कमाल तापमानात घसरण झाली आहे. नागपुरात सरासरी पाच अंशाने तापमान घसरले असून २७.८ अंशाची नाेंद झाली. इतर जिल्ह्यातही २७ ते २९ अंशाच्या रेंजमध्ये दिवसाचे तापमान आहे. दरम्यान, २३ राेजी नागपूरसह विदर्भात तुरळक ठिकाणी विजा व ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण राहील; पण पावसाचा जाेर ओसरण्याची शक्यता आहे.