झरीचा वाघ आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:02+5:302021-07-14T04:12:02+5:30
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरीलगतच्या झरी वन क्षेत्रातून ट्रँक्युलाईज करून आणलेला वाघ आता पुढील आदेशापर्यंत सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट ...
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरीलगतच्या झरी वन क्षेत्रातून ट्रँक्युलाईज करून आणलेला वाघ आता पुढील आदेशापर्यंत सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवला जाणार आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला येथे आणण्यात आले.
पशुवैद्यकीय चमूकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो स्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. त्याला कायमस्वरूपी ट्रान्झिटमध्ये अथवा गोरेवाड्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानंतरच हे निश्चित होईल.
सोमवार सायंकाळी वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने झरीच्या जंगलालगतच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या या वाघाला ट्रँक्युलाईज केले होते. या वाघाने गावालगतच्या शेतातील जनावरांवर तसेच अविनाश लेनगुरे या युवकावर हल्ला केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे गावकरी दहशतीत आले होते. स्थानिकांच्या मते, या परिसरात चार वाघांचा संचार सुरू आहे.