सूर्य मे महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर
By निशांत वानखेडे | Published: April 30, 2024 04:42 PM2024-04-30T16:42:24+5:302024-04-30T16:58:48+5:30
खगाेलीय हालचालींचा असाही संबंध : ३ ते ३१ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात शुन्य सावली
नागपूर : मे महिन्यात तसाही उन्हाचा तडाखा अत्याधिक तीव्र असताे. तस ताे का असताे, यामागे खगाेलीय हालचाली कारणीभूत आहेत. सूर्य सध्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत आहे, म्हणजे उत्तरायण सुरू आहे. आता ताे कर्कवृत्आच्या जवळपास असून २१ जून राेजी बराेबर कर्कवृत्तावर असेल, जिथून परत दक्षिणायण सुरू हाेईल. संपूर्ण महाराष्ट्र हा कर्कवृत्ताच्या खाली आहे. आपल्या अक्षवृत्तीय स्थितीनुसार ३ मे पासून सूर्य बराेबर महाराष्ट्राच्या डाेक्यावर असेल.
खगाेलीय अभ्यासक प्रभाकर दाैड यांनी सांगितले, अगदी डाेक्यावर असल्याने सूर्याची तीव्रता अधिक प्रखरतेने जाणविणार आहे. त्यानुसार ३ ते ३१ मे या कलावधीत सूर्य डाेक्यावर असेल आणि अक्षवृत्तीय स्थितीनुसार वेगवेगळ्या शहरात नागरिकांना शुन्य सावलीचा अनुभव घेता येईल. नागपूर शहरात २६ मे राेजी तर अकाेल्यात २३ मे राेजी शुन्य सावलीचा अनुभव घेता येईल. अशी घटना केवळ मकरवृत्त ते कर्कवृत्त या भागात घडून येते. मध्य प्रदेशच्या भाेपाळ शहरातून कर्कवृत्ताची रेखा गेली आहे. त्यामुळे भाेपाळसह, रांची, झाशी आदी शहरातही शुन्य सावली अनुभवता येईल. २१ जून राेजी सूर्य कर्कवृत्तावर पाेहचल्यानंतर २२ जूनला दक्षिणेकडे परत फिरेल. त्यामुळे नागपूरकरांना १७ जुलै राेजी पुन्हा शुन्य सावलीची घटना घडेल पण पाऊस असल्यास ती अनुभवता येणार नाही.
उन्हाळ्याच्या सुटीत आकाश नजारे
- चंद्रासोबत ग्रह ओळख अधिक सुलभ करायची असेल तर ४ मे च्या पहाटे वलयांकित शनी ग्रह चंद्राचे वर दिसेल, ५ तारखेला लालसर रंगाचा मंगळ ग्रह चंद्राचे अगदी जवळ आणि ६ ला सर्वात लहान असलेला बुध ग्रह चंद्रकोरी खाली पाहता येईल.
- ५ मे रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर कुंभ राशी समुहात दरताशी ६० अशा विविध रंगांच्या उल्का रात्री २ ते पहाटे ५.३० पर्यंत पडताना दिसतील.
गुरु व शूक्र ग्रहांचे अस्त
आजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्राचा अस्त ६ मे ला पूर्वेस तर सर्वात मोठा असलेल्या गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल. ग्रामीण भागातील लोक ‘चांदणी बुडी’ असेही म्हणतात. ३१ मे नंतर या ग्रहांचा पुन्हा उदय हाेईल.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र दर्शन
आपल्या पृथ्वीला सूमारे दीड तासात एक फेरी पूर्ण करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन चार दिवस पहायला मिळेल. ९ मे राेजी रात्री ७.५७ ते ८.०३ या वेळी नैॠत्येकडून ईशान्य बाजूस जाताना खूप छान फिरत्या चांदणी रूपात दिसेल. १० ला रात्री ७.०८ते ७.१३ या वेळी दक्षिण पूर्व आकाशात, ११ मेच्या पहाटे ४.५७ ते ५.०३ या वेळी वायव्य ते आग्नेय दिशेला तर १३ राेजी पहाटे ४.५४ ते ५ वाजता वायव्य ते दक्षिणेकडे जाताना बघावे.