आज नागपुरात ‘शून्य सावली दिवस’; दुपारी १२.१० वाजता येईल पायाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 07:30 AM2022-05-26T07:30:00+5:302022-05-26T07:30:01+5:30
Nagpur News अवकाशात सूर्याच्या परिक्रमेनुसार घडणाऱ्या घडामाेडीमधील ही एक घटना. यालाच ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीराे शॅडाे डे’ असेही म्हणतात. नागपुरात आज म्हणजे गुरुवारी दुपारी १२.१० वाजता या शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
नागपूर : आपली स्वत:ची सावली दिवसा साथ साेडत नाही आणि अंधारात ती दिसत नाही. मात्र वर्षातून काही ठरावीक दिवशी काही क्षणांसाठी ती आपल्याला दिसत नाही. ती गायब हाेते असे नाही, पण तंताेतंत पायाखाली येत असल्याने काही क्षण दिसेनाशी हाेते. अवकाशात सूर्याच्या परिक्रमेनुसार घडणाऱ्या घडामाेडीमधील ही एक घटना. यालाच ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीराे शॅडाे डे’ असेही म्हणतात. नागपुरात आज म्हणजे गुरुवारी दुपारी १२.१० वाजता या शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या भासमान मार्गक्रमणादरम्यान पृथ्वीच्या २३.५० अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्तादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे या काळात ठिकठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून मध्य प्रदेशातील भोपाळजवळून २३.५०° अंशावरून कर्कवृत गेले आहे, त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळांत काही सेकंदांचा फरक आहे. नागपुरात २६ मे राेजी शून्य सावली दिवस असताे व दुपारी १२ ते १२.३५ यादरम्यान ताे अनुभवता येताे. तसे जिल्ह्यात २४ मेपासूनच ठिकठिकाणी शून्य सावलीचा अनुभव घेतला जात आहे.
२६ मे : नागपूर शहर व कामठी (१२.१०), कळमेश्वर (१२.११)
२७ मे : मौदा (१२.०९), रामटेक (१२.१०), काटोल (१२.१३), पारशिवनी (१२.१०), सावनेर (१२.११)
२८ मे : नरखेड (१२.१३)