शंभराव्या नाट्य संमेलनापूर्वीचा ‘झिरो शो’ नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:01 PM2019-01-10T22:01:01+5:302019-01-10T22:02:20+5:30

गेल्या ३३ वर्षांची नागपूरकरांची प्रतीक्षा संपविणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या २२ ते २५ फेब्रुवारीला शहरात होऊ घातले आहे. त्यामुळे वैदर्भीय रंगकर्मींसह रसिकांमध्येही उत्साह आहे. बडेजाव नाही, पण संमेलनाचे स्वरूप भव्य आणि वैदर्भीय नाट्यकर्मी व रसिकांची अपेक्षापूर्ती करणारे राहील, असा विश्वास व्यक्त करीत पुढल्या वर्षी होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनापूर्वीचा हा ‘झिरो शो’च समजावा,अशी ग्वाही अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.

'Zero Show' in Nagpur before the centenary Natya Sammelan | शंभराव्या नाट्य संमेलनापूर्वीचा ‘झिरो शो’ नागपुरात

शंभराव्या नाट्य संमेलनापूर्वीचा ‘झिरो शो’ नागपुरात

Next
ठळक मुद्दे२२ ते २५ फेब्रुवारीला नाट्य संमेलन : वैदर्भीय रंगकर्मींची अपेक्षापूर्ती करण्याचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या ३३ वर्षांची नागपूरकरांची प्रतीक्षा संपविणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या २२ ते २५ फेब्रुवारीला शहरात होऊ घातले आहे. त्यामुळे वैदर्भीय रंगकर्मींसह रसिकांमध्येही उत्साह आहे. बडेजाव नाही, पण संमेलनाचे स्वरूप भव्य आणि वैदर्भीय नाट्यकर्मी व रसिकांची अपेक्षापूर्ती करणारे राहील, असा विश्वास व्यक्त करीत पुढल्या वर्षी होणाऱ्या शंभराव्या नाट्यसंमेलनापूर्वीचा हा ‘झिरो शो’च समजावा,अशी ग्वाही अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.
संमेलनाच्या पार्श्वभूमीपवर अ.भा. मराठी नाट्य परिषद व परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे संयुक्त पत्रपरिषद गुरुवारी नागपुरात घेण्यात आली. प्रसाद कांबळी यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहाची तारीफ केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनीच या सभागृहाबाबत माहिती दिली होती. आज पाहिल्यावर प्रत्यक्ष अनुभूती आली असून, भट सभागृह व रेशीमबाग मैदान हे स्थान संमेलनासाठी निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी परिषदेच्या निवडणुकीनंतर २० दिवसात मुलुंड येथे नाट्य संमेलन घेण्यात आले होते. मात्र अत्यंत नियोजनाने आणि कमी खर्चात आजपर्यंत पार पडलेल्या संमेलनात मुलुंडचे संमेलन नीटनेटक्या पद्धतीने पार पडल्याचा दावा त्यांनी केला. हे संमेलन ६० तास चालण्याचा विक्रम केला होता व एक आदर्श प्रस्थापित केल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरचे ९९ वे संमेलनही असेच आदर्शवत ठरेल व यात वेगळे काही देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे विदर्भाच्याच भूमीचे आहेत. संमेलनात वैदर्भीय नाट्यकर्मी व रंगकलांना प्राधान्य देण्यात येईल. झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भाची ओळख आहे. त्याचा प्रामुख्याने यात समावेश असेल. वैदर्भीय कलासंस्कृतीचे दर्शत यात घडेल. याशिवाय महाराष्ट्रातील लोककला, प्रायोगिक रंगभूमी, बालनाट्य, हौशी रंगभूमी अशा अनेक प्रकारांचा यात समावेश राहील. गदिमा व पु.ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी व राम गणेश गडकरी यांची स्मृती शताब्दी असल्याने त्यांचे स्मरण करणारे विशेष आयोजन होईल. संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची प्रकट मुलाखत, नाट्यविषयक परिसंवाद, चर्चासत्र तसेच विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंतांचा सत्कारही होणार असल्याचे सांगत नाट्यसंमेलनाची रूपरेषा लवकरच सादर केली जाणार असल्याचे कांबळी यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, सदस्य मंगेश कदम, आयोजन समितीचे प्रमुख संदीप जोशी, गिरीश गांधी, परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, केंद्रीय परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, सहसचिव सतीश लोटकर व दिगंबर प्रभू प्रामुख्याने उपस्थित होते.
गांधी यांना दिलेला शब्द पाळला
मागील वर्षी निवडणुकीत विदर्भाने आम्हाला सहकार्य केले होते. त्यामुळे येथील सदस्यांच्या प्रयत्नानुसार हे संमेलन नागपूरला करण्याचा शब्द मी गिरीश गांधी यांना दिला होता. हा शब्द पाळल्याचे समाधान प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केले. नागपूरचा प्रेक्षक खूप चौकस आहे. त्यांना वेगळे काहीतरी देण्याचे व तरुणाईला ऊर्जा देणारे नवीन काही देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे संमेलन संकल्पनेवर आधारित असून लवकरच संमेलनाचा लोगो बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२० जानेवारीपर्यंत कार्यक्रम सादर करावे
विदर्भ व महाराष्ट्रातील सर्व नाट्यसंस्थांना त्यांचे कार्यक्रम २० जानेवारीपूर्वी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती मंडळाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी सांगितले. संस्थांकडून कार्यक्रम सादर झाल्यानंतर रूपरेखा आखून संमेलनाची पत्रिका तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २१ फेब्रुवारीपासून संमेलनाचे पूर्वरंग सुरू होणार असून २२ ला दिंडी काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आवश्यक खर्चाला ‘बडेजाव’ म्हणू नये
संमेलनातील खर्च व बडेजावच्या प्रश्नावर शरद पोंक्षे यांनी उत्तर दिले. नाट्यसंमेलनाचा मोठा सोहळा असल्याने रंगभूमीविषयक गोष्टी घडाव्या, मोठे कलावंत व सेलीब्रिटी यावे, अशी रसिकांचीही अपेक्षा असते. ज्यांनी रंगभूमीच्या सेवेत आयुष्य घालविले त्यांचाही या संमेलनात सहभाग असतो. अशा मोठ्या कलावंतांचे सन्मानपूर्वक आदरातिथ्य तसेच संमेलनात येणाऱ्या हजारो लोकांची योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे असते. वर्षातून एकदा होणारे हे संमेलन भव्य व्हावे, अशी कलावंत व रसिकांची इच्छा असते. या आवश्यक खर्चाला बडेजाव म्हणता येणार नाही, असे मत पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Web Title: 'Zero Show' in Nagpur before the centenary Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.