कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:09 AM2021-07-17T11:09:31+5:302021-07-17T11:09:59+5:30
Nagpur News कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच आता झिका विषाणूची चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच आता झिका विषाणूची चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ रुग्णांना या विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. हा विषाणू एडीस या डासांपासून पसरतो. यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. घराघरात जाऊन साचलेल्या पाण्याची तपासणी व फवारणीचे आदेशही देण्यात आले आहेत.
एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका विषाणूची लागण होते. या डासांची निर्मिती स्वच्छ पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना झिकाचा धोका अधिक राहतो. विशेषत: गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बाळाला या झिका विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये विषाणू बाळाच्या अविकसित मेंदूवर थेट हल्ला करतो. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचे डोके शरीराच्या तुलनेत छोटे असते. या आजाराला ‘मायक्रोसेफली’ म्हटले जाते. झिकावर कोणतेही निश्चित उपचार नाही. यामुळे डासांवर नियंत्रण व डास चावण्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हाच यावर योग्य उपाय आहे. यासाठी मनपातर्फे या डासाची जनजागृती व उपाययोजनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
-कशामुळे होतो झिका
‘एडीस एजिप्टी’ डास चावल्यानंतर झिका विषाणूची लागण होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता असते.
-रोगाची लक्षणे
:: प्राथमिक लक्षणात, ताप येणे
:: अंग दुखणे
:: अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे
:: प्रचंड डोकेदुखी
:: डोळे लाल होणे
:: अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
-उपाययोजना काय?
मधुमेह, यकृत व हृदयविकार असलेल्या रुग्णांना या रोगाचा धोका अधिक असतो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. पाणी साचून राहणार नाही किंवा साचलेल्या पाण्यात कीटकनाशक फवारणी करावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-झिका रुग्णाची नोंद नाही मात्र, उपाययोजना
एडीस या डासांपासून झिकाच नव्हे तर डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची शक्यता असते. सध्या आपल्याकडे झिकाचे रुग्ण नाहीत मात्र डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने घराघराची तपासणी, कीटकनाशक फवारणी व १४ ते २२ जुलै दरम्यान धूरफवारणी मोहीम हाती घेतली आहे.
-दीपाली नासरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी