जिल्हा परिषद, पंचायत समितीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:13+5:302021-09-16T04:12:13+5:30
ओबीसींच्या आरक्षणावरून भाजप आक्रमक : जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन हिंगणा/रामटेक/पारशिवनी/मौदा : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ...
ओबीसींच्या आरक्षणावरून भाजप आक्रमक : जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन
हिंगणा/रामटेक/पारशिवनी/मौदा : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही. त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्या तातडीने रद्द करण्यात याव्यात तसेच सरकारने न्यायालयात ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सादर करावा, अशी मागणी करीत भाजपच्या वतीने बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगणा मार्गावर बंशीनगर नाका येथे आ. समीर मेघे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. संध्या गोतमारे, अंबादास उके, माजी जि. प. सदस्य राजेंद्र हरडे, सुचिता ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
पारशिवनी तालुक्यात जि. प. व पं. स.च्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करीत भाजपच्या ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर निवडणूक रद्द करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग व सरकारला तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. डॉ. राजेश ठाकरे, कमलाकर मेंघर, अतुल हजारे, डॉ. मनोहर पाठक, आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
मौदा तहसील कार्यालयावर पोटनिवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी आ. टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. माजी जि. प. अध्यक्षा निशा सावरकर, मौद्याच्या नगराध्यक्षा भारती सोमनाथे, सदानंद निमकर, आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
रामटेक तालुक्यात भाजपच्या ओबीसी मंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, लक्ष्मण केने, ज्ञानेश्वर धोक, विशाल कामदार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
150921\1633-img-20210915-wa0015.jpg
निवेदन