जिल्हा परिषद पदभरती; लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला !
By गणेश हुड | Published: October 19, 2023 02:51 PM2023-10-19T14:51:49+5:302023-10-19T14:52:05+5:30
नियोजन कोलमडले : राज्यात केंद्रच उपलब्ध नसल्याने परीक्षा लांबणीवर
नागपूर : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतील १९ हजार ४६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कमी पदसंख्या असलेल्या १२ पदांसाठी ७ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली. मात्र अधिक पदसंख्या असलेल्या विविध १८ पदांच्या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध नसल्याने या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात पदभरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीने परीक्षेचे शेड्युल जाहीर न केल्याने लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाच्या विविध विभागातर्फे पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आधीच परीक्षा केंद्र बुक आहेत. केंद्र उपलब्ध नसल्याने जि.प.च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्या आहेत. एकाच वेळी परीक्षा होत असल्याने व आयबीपीएस कंपनीने परीक्षा केंद्र आधी बुक केलेले नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर शहरात एकाचवेळी चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, अशी सुविधा आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही अशी व्यवस्था नाही. परिणामी भंडारा, यवतळमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील अर्जधारकांनी नागपुरातील केंद्राला पसंती दिली आहे. १७ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा संपल्यानंतर कंपनीकडून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी अर्जधारकांना अपेक्षा होती. मात्र अद्याप आयबीपीएस कंपनीने वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
अर्जधारकांत अस्वस्थता
७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत कमी पदसंख्या असलेल्या जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी) कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहायक (लिपिक), पर्यवेक्षिका आणि यासह १८ पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.