जिल्हा परिषद प्रचाराचा आज 'सुपर संडे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 11:03 AM2021-10-03T11:03:07+5:302021-10-03T11:42:56+5:30
आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत.
नागपूर :जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान आहे. आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत.
जि. प.मध्ये सत्ता स्थापन्यात काँग्रेसचे नेते व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे पोटनिवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या दिमतीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नाना गावंडे, जि. प. अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर आहेत. शनिवारी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली. सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून काँग्रेसने पोटनिवडणूक फारच गांभीर्याने घेतली आहे.
भाजपही जिल्हा परिषदेत आपले सदस्य वाढविण्याबरोबरच सत्ता समीकरण जुळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यावर आहे. काटोल नरखेडात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांची गोची झाली आहे. काँग्रेससोबत आघाडीत लढत असल्याने काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत.
रामटेक विधानसभा क्षेत्रात जि. प.च्या दोन जागेवर निवडणूक आहे. शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल यांनी रामटेक व पारशिवनी तालुक्यात फोकस केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षावर केलेल्या टीकेमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सेनेप्रती नाराजीचा सूर आहे. खा. कृपाल तुमाने, राजू हरणे, संदीप इटकेलवार यांनीही शिवसेनेच्या प्रचाराचा झेंडा उचलून धरला आहे.
हवामान खात्याने दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शनिवारी उमेदवारांनी भर पावसात प्रचाररॅली काढून प्रचार केला. रविवारी सकाळपासूनच उमेदवारांच्या प्रचाररॅली निघणार आहेत. दुपारी मेळावे व सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
- आमदारांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यात काँग्रेसचे २, राष्ट्रवादी १, शिवसेना १ व भाजपचे २ आमदार आहेत. भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघात ४ सर्कलमध्ये लढत आहे. अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात देखील ४ सर्कलमध्ये निवडणूक आहे. मंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघात दोन सर्कलमध्ये, भाजपचे आ. टेकचंद सावरकर यांच्या मतदारसंघात ३ सर्कलमध्ये, आ. आशिष जैस्वाल यांच्या मतदारसंघात दोन सर्कलमध्ये व आ. राजीव पारवे यांच्या मतदारसंघात एका सर्कलमध्ये निवडणूक आहे. त्यामुळे आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सर्कल | अपात्र सदस्य (पक्ष) | यांच्यात लढत |
सावरगाव | देवका बोडखे (राष्ट्रवादी), | देवका बोडखे (राष्ट्रवादी), पार्वती काळबांडे (भाजप), अंजली सतीश शिंदे (अपक्ष) |
भिष्णूर | पूनम जोध (राष्ट्रवादी), | प्रवीण जोध (राष्ट्रवादी), नितीन सुरेश धोटे (भाजप), संजय ढोकणे (शिवसेना) |
येनवा | समीर उमप (शेकाप), | समीर उमप (शेकाप), नीलेशकुमार धोटे (भाजप) |
पारडसिंगा | चंद्रशेखर कोल्हे (राष्ट्रवादी), | शारदा कोल्हे (राष्ट्रवादी), मीनाक्षी सरोदे (भाजप) |
वाकोडी | ज्योती शिरसकर (काँग्रेस), | ज्योती शिरसकर (काँग्रेस), आयुषी धापके (भाजप) |
केळवद | मनोहर कुंभारे (काँग्रेस), | सुमित्रा कुंभारे (काँग्रेस), संगीता मुलमुले (भाजप) |
करंभाड | अर्चना भोयर (काँग्रेस), | अर्चना भोयर (काँग्रेस), प्रभा कडू (भाजप), संजीवनी गोमकाळे (शिवसेना) |
बोथिया पालोरा | कैलास राऊत (काँग्रेस), | कैलास राऊत (काँग्रेस), नकुल बरबटे (राष्ट्रवादी), लक्ष्मण केणे (भाजप), देवानंद वंजारी (शिवसेना) |
गुमथळा | अनिल निदान (भाजप), | अनिल निदान (भाजप), दिनेश ढोले (काँग्रेस) |
वडोदा | अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस), | अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस), अनिता चिकटे (भाजप), सोनम करडभाजने (प्रहार) |
अरोली | योगेश देशमुख (काँग्रेस), | योगेश देशमुख (काँग्रेस), सदानंद निमकर (भाजप) |
गोधनी रेल्वे | ज्योती राऊत (काँग्रेस), | कुंदा राऊत (काँग्रेस), विजय राऊत (भाजप) |
निलडोह | राजेंद्र हरडे (भाजप), | राजेंद्र हरडे (भाजप), संजय जगताप (काँग्रेस) |
इसासनी | अर्चना गिरी (भाजप), | अर्चना गिरी (भाजप), गीता हिरणखेडे (राष्ट्रवादी), संगीता कौरती (शिवसेना) |
डिगडोह सुचिता ठाकरे (राष्ट्रवादी), सुचिता ठाकरे (भाजप), रश्मी कोटगुले (राष्ट्रवादी)