सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज होणार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:22 PM2020-08-28T22:22:43+5:302020-08-28T22:23:49+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे, प्रशासनाने आठवड्याभराचे लॉकडाऊन केले. हे लॉकडाऊन वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेतील कोरोनाबाधितांची संख्या ३० वर पोहचली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा परिषद आठवडाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या चर्चेत प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कुंभेजकर म्हणाले, सर्व तालुक्यांवरील यंत्रणा सजग आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. या आठवड्यात बुधवारी महालक्ष्मी पूजनाची सुटी होतीच त्यामुळे इतर चार दिवस वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी आरोग्य विभागाचे कामकाज सुरूच आहे. तसेच गरजेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे.
हा लॉकडाऊन पुढे वाढविणार का तसेच जिल्हा परिषद सुरू झाल्यानंतर कर्मचारी उपस्थितीत कपात होणार का याबाबत विचारले असता ते म्हणाले, लॉकडाऊन हा अंतिम उपाय नाही. जिल्हा परिषदेसारखी यंत्रणा फार काळ बंद ठेवणे व्यवहार्य नाही. मात्र लॉकडाऊन वाढविणे आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे हे निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातील. तूर्तास केवळ अत्यावश्यक सेवांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.