जि.प.सर्कलमध्ये फेरबदल
By admin | Published: October 3, 2016 02:55 AM2016-10-03T02:55:13+5:302016-10-03T02:55:13+5:30
२०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करण्यात आली आहे.
हिंगण्यात दोन जागा वाढल्या : पारशिवनी, मौदा, भिवापूर तालुक्यात प्रत्येकी एक जागा कमी
कमलेश वानखेडे नागपूर
२०११ च्या लोकसंख्येनुसार नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करण्यात आली आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेच्या ५९ जागा होत्या. नव्या रचनेत एक जागा कमी झाली आहे. आता ५८ सदस्य असतील. नव्या रचनेत पारशिवनी, मौदा व भिवापूर या तालुक्यांमधील प्रत्येक एक जिल्हा परिषद सदस्याची जागा कमी झाली आहे. तर हिंगणा तालुक्यात दोन जागा वाढल्या आहेत. आता हिंगणा तालुक्यातून सर्वाधिक आठ जिल्हा परिषद सदस्य निवडले जातील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा या तालुक्यावर अधिक फोकस असणार आहे.
२०१२ च्या निवडणुकीनुसार हिंगणा तालुक्यात जिल्हा परिषदचे डिगडोह, दाभा, रायपूर, गुमगाव, कान्होलीबारा असे सहा सर्कल आहेत. यापैकी दाभा व रायपूर हे दोन सर्कल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून उर्वरित चारही सर्कलवर भाजपचा झेंडा आहे. हिंगणा नगर पंचायत झाली असल्यामुळे जिल्हा परिषदेतून वगळण्यात आले. मात्र, असे असले तरी वाढीव लोकसंख्येमुळे या तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहाऐवजी आठ सर्कल करण्यात आले आहेत. ही वाढीव सर्कल करताना मोठ्या प्रमाणात इकडची गावे तिकडे जोडण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. सर्कल रचना जाहीर झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पारशिवनी तालुक्यात कोलितमारा, पारशिवनी, साटक, टेकाडी, कन्हान हे पाच सर्कल आहेत. यापैकी कोलितमारा व टेकाडीमध्ये काँग्रेस, पारशिवनी व साटकमध्ये भाजप तर कन्हान शिवसेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोनेकर हे कन्हानमधूनच विजयी झाले होते. कन्हान नगरपरिषद स्थापन झाल्यामुळे आता या तालुक्यात एक सर्कल कमी होणार आहे. याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.
मौदा तालुक्यात सद्यस्थितीत अरोली कोदामेंढी, तारसा चाचेर, खात रेवराल, मौदा बाबदेव व चिरव्हा धानोला हे पाच सर्कल आहेत. यापैकी अरोली कोदामेंढी व चिरव्हा धानोला भाजपकडे, तारसा चाचेर व मौदा बाबदेव शिवसेनेकडे तर खात रेवराल काँग्रेसकडे आहे. मौदा ही नगर पंचायत झाल्यामुळे नव्या रचनेत या तालुक्यातही एक सर्कल कमी होत आहे. याचा फटका नेमका कुणाला बसतो ते सर्कल रचना जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल. भिवापूर तालुक्यात भिवापूर, कारगाव व नांद असे तीन सर्कल आहेत. यापैकी भिवापूर भाजपकडे तर कारगाव व नांद काँग्रेसकडे आहेत. भिवापूरदेखील नगर पंचायत झाली आहे. त्यामुळे नव्या रचनेत या तालुक्यातही एक सर्कल कमी झाले आहे.