जि.प. व नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा रोवणार
By admin | Published: July 1, 2016 03:07 AM2016-07-01T03:07:35+5:302016-07-01T03:07:35+5:30
नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा निर्धार : पहिली लढाई भाजप विरोधात
नागपूर : नागपूर जिल्ह्याने काँग्रेसला नेहमी बळ दिले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे प्रस्थ वाढले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत जुने काँग्रेसी, युवा कार्यकर्ते, महिला आदींना सोबत घेऊन गावागावात प्रत्येक बुथवर पक्षाची बांधणी केली जाईल. गटबाजी, मतभेद बाजूला सारून प्रसंगी एक पाऊल मागे येण्याची तयारी ठेवून सर्वांना विश्वासाने सोबत घेतले जाईल. आपली पहिली लढाई भाजपसोबत आहे. या लढ्यात सर्व काँग्रेसींना सहभागी करून आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवणे हे आपले पहिले लक्ष्य आहे, असा निर्धार काँग्रेसचे नवनियुक्त नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
केंद्र, राज्यात व जिल्हा परिषदेतही भाजपची आहे. शिवाय भाजपचे केंद्र व राज्यातील हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर तगडे आव्हान असून सत्ता गाठण्याची वाट वाटते तेवढी सोपी नाही. अशा कठीण राजकीय परिस्थितीत माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या आव्हानांबाबत मुळक यांच्याशी बातचीत केली असता काँग्रेसचा कार्यकर्ता एकदिलाने जागा झाला तर काहीच कठीण नाही, अशी आत्मविश्वास व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मुळक म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्या की गावातील कार्यकर्ता ताकदीने नेत्याच्या पाठीमागे उभा राहतो. दिवसरात्र काम करतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे त्या निवडणुकीत नेत्यांनीही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये तसा विश्वास निर्माण करायचा आहे. एकदा हा विश्वास निर्माण झाला की कुठलीही निवडणूक जिंकणे कठीण नाही.
भाजपने सत्तेत येताना शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी, व्यापाऱ्यांना वेगवेगळी आश्वासने दिली. मात्र, ती आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या सर्व घटकांपर्यंत पोहचून त्यांना भाजपकडून होत असलेली दिशाभूल पटवून दिली जाईल. भाजपच्या अव्यावहारिक व फसव्या घोषणा जनतेसमोर मांडल्या जातील. काँग्रेसचा आपले हित साधू शकते हा विश्वास पुन्हा एकदा ग्रामीण जनतेत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील समविचारी पक्षाशी चर्चा करून, प्रसंगी त्यांना एकत्र करून भाजप विरोधातील लढ्याला कसे बळ देता येईल, यासाठी रणनीती आखली जाईल, असेही मुळक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)