झुलेलालच्या भागीदारांना जामीन
By admin | Published: May 20, 2017 02:53 AM2017-05-20T02:53:07+5:302017-05-20T02:53:07+5:30
नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या
३६ कोटी रुपयांची जमीन हडपल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या दोन आरोपी भागीदारांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने गुरुवारी प्रत्येकी १५ हजाराचा जात मुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या दोन हमीवर सशर्त जामीन मंजूर करून सुटका केली.
ओमप्रकाश गोकुलदास बजाज आणि सुखदेव प्रेमचंद भागचंदानी, अशी आरोपींची नावे आहेत.
जरीपटका येथील रोशन मिनहलदास जोधानी, टिकमदास निथलदास मोटवानी, ओमप्रकाश गोकुलदास बजाज, सुखदेव प्रेमचंद भागचंदानी आणि प्रकाश दयाल आसुदानी यांनी ५ एप्रिल १९९९ रोजी झुलेलाल डेव्हलपर्स नावाच्या फर्मचे भागीदारपत्र तयार केले होते.
या भागीदारांनी कमलेश लक्ष्मणलाल जयस्वाल आणि इतर चार, अशा पाच जणांकडून नारा येथील नऊ एकर जमीन सहा खरेदी खताद्वारे विकत घेतली होती. एप्रिल २००० मध्ये या जमिनीच्या मालकांच्या नातेवाईक उषा लाला जयस्वाल आणि इतरांनी जमीन खरेदीदारांविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने २६ जून २००६ रोजी ‘जैसे थे’चा आदेश दिला होता.
प्रकरण न्यायालयात असताना ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांनी या जमिनीचे सर्व अधिकार जयप्रकाश गोकुलदास बजाज याला ६ डिसेंबर २००५ रोजी आममुख्त्यारपत्र तयार करून दिले होते.
या आममुख्त्यारपत्राचा गैरवापर करून जयप्रकाश बजाज याने झुलेलालच्या इतर भागीदारांना अंधारात ठेवून ही जमीन स्वत: आणि त्याचा भाऊ सुरेश गोकुलदास बजाज यांना २३ लाख ९४ हजार रुपयात विकल्याचा खोटा व बनावट खरेदीखताचा दस्त तयार करून या दस्ताची नोंद महाल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून ३६ कोटींची ही जमीन हडपली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक करून त्यांचा एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता.
गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. कैलाश डोडानी, अॅड. प्रकाश रामरक्षियानी आणि अॅड. हितेश खंडवानी यांनी काम पाहिले.