नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास; सीईओ राकेश रंजन यांच्याशी संवाद

By जितेंद्र ढवळे | Published: January 28, 2024 07:24 PM2024-01-28T19:24:31+5:302024-01-28T19:24:41+5:30

खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी रविवारी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. या चर्चासत्राची सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली.

Zomato's journey started from Nagpur; A conversation with CEO Rakesh Ranjan | नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास; सीईओ राकेश रंजन यांच्याशी संवाद

नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास; सीईओ राकेश रंजन यांच्याशी संवाद

नागपूर : ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वातील झोमॅटोचा जन्म संत्रानगरी नागपुरातून झाल्याची माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’दरम्यान दिली.

खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी रविवारी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. या चर्चासत्राची सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी एंजेल इन्व्हेस्टर शशिकांत चौधरी यांनी राकेश रंजन यांच्याशी संवाद साधला. झोमॅटोच्या प्रवासाबाबत सांगताना राकेश रंजन म्हणाले, ‘सात वर्षांपूर्वी मी झोमॅटो जॉइन केले. त्यावेळी झोमॅटो ॲप लाँच करणारे पहिले शहर नागपूर होते. त्याच नागपुरात आज मी संवाद साधत असल्याचा आनंद आहे.’

ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक जे खाद्यपदार्थ कुठल्याही पारंपरिक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाहीत, असे पदार्थ ऑर्डर करायचे. वेगळ्या प्रकारच्या, नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे ऑर्डर अधिक यायचे. त्यानंतरच्या टप्प्यात नियमित ग्राहक वाढलेत. ते रोजच्या नाश्त्यातील, जेवणातील पदार्थ मागवू लागलेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिझ्झा, डेझर्ट यांचा समावेश होता. आता ग्राहकांना राजस्थानी तसेच इतर प्रादेशिक जेवण त्या-त्या पारंपरिक अनुभवासह हवे आहे. त्यादृष्टीने आम्ही ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. मुलाखतीदरम्यान राकेश रंजन यांनी ग्रोथ आणि प्रोफॅटिबिलिटी यातील परस्परपूरकता, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याकडे भारतीयांचा वाढता कल तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप क्षेत्रातील इतर स्पर्धक याबाबत मते मांडलीत.

क्लाउड किचन कल्चर वाढले
आपल्याकडे पारंपरिक रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन असे दोन प्रकार आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपच्या उदयानंतर आणि विशेषत: कोव्हिडनंतर क्लाउड किचनचे ग्राहक वाढले आहेत. अनेक पारंपरिक हॉटेल-रेस्टॉरंट स्वत:चे क्लाउड किचन सुरू करताहेत. गेल्या काही वर्षांतील हा बदल अविश्वसनीय आहे, असल्याकडे राकेश रंजन यांनी लक्ष वेधले.

Web Title: Zomato's journey started from Nagpur; A conversation with CEO Rakesh Ranjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Zomatoझोमॅटो