प्राणिसंग्रहालयातील कंत्राटी कर्मचारीच करतात हिंस्र श्वापदांची देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:51+5:302021-05-20T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांचे पिंजरे हाताळण्याचे काम जोखमीचे असल्याने त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. असे असले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांचे पिंजरे हाताळण्याचे काम जोखमीचे असल्याने त्यांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. असे असले तरी नागपुरातील प्राणिसंग्रहालयात काम करणारे हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसोबतच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचाही विषय गंभीर ठरला आहे.
नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालय आणि गोरेवाडा प्राणिसंग्रहालय या दोन्ही ठिकाणी वन्य श्वापदे आहेत. अलीकडे कोरोना संक्रमणामुळे पर्यटन बंद असले तरी अन्य वेळी मात्र येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. या दोन्ही प्राणिसंग्रहालयामध्ये वन्यजीवांची आणि त्यांच्या पिंजऱ्यांची देखभाल करणारे कर्मचारी मात्र कंत्राटी आहेत.
देशात असलेल्या प्राणिसंग्रहालयांपैकी ८० टक्के प्राणिसंग्रहालये वनविभागाकडे आहेत. १०-१५ टक्के अन्य व्यवस्थापनाकडे तर काही खासगी आस्थापनांकडे आहेत. नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालय पंजाबराव कृषी विद्यापीठाअंतर्गत नागपूर कृषी महाविद्यालय चालविते, तर गोरेवाडाचे व्यवस्थापन वनविभागाकडे आहे. कर्मचारी नियुक्तीची जबाबदारी आणि अधिकार संबंधित व्यवस्थापनाकडे असतो. आस्थापना तयार करून स्टाफ ठरविला जातो. महाराजबागेतील कर्मचाऱ्यांचा स्टाफ पंकृविने ठरविला. मात्र चतुर्थ श्रेणी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर नव्याने पदे भरण्यात आली नाहीत. वनविभागाच्याही पदभरत्याही मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. परिणामत: कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून हे जबाबदारीचे काम रेटले जात आहे. प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून प्राणिसंग्रहालये उभारली जातात. त्यांच्या व्यवस्थापनावरही कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी होत असताना प्राण्यांची देखभाल करणारे कर्मचारीच कंत्राटी आहेत.
...
विमाही नाही, सुरक्षेचे काय?
हिंस्र प्राण्यांच्या पिंजऱ्यांची देखभाल करणारे कर्मचारी कंत्राटी असल्याने कर्मचारी आणि प्राणी या दोघांच्याही सुरक्षेचे काय, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे. महाराजबागेतील कर्मचाऱ्यांचा तर विमाही उतरविलेला नाही. कर्मचारी स्थायी नसल्याने वन्यजीवांच्या जीविताची आणि सुरक्षेची जबाबदारी निश्चित करताना कायदेशीर अडचणी आहेत. अशा परिस्थितीमध्ये पिंजऱ्याजवळ जाऊन जोखमीचे काम करणारे कर्मचारी आणि प्राणीही सुरक्षित नाहीत, हेच दिसते.
...
महाराजबागेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात न आल्याने कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या निर्णयाअंतर्गत आमचे व्यवस्थापन सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे लावले असून कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो.
- सुनील बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय
...