जि.प. सभापती बोढारे व अग्रवाल यांच्यात आरोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:45+5:302021-09-26T04:09:45+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे व सदस्य राधा अग्रवाल यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या ...
नागपूर : जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे व सदस्य राधा अग्रवाल यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यात. कोरोना काळात प्रशिक्षण देऊन १५ लाखांच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोप अग्रवाल यांनी केला होता. त्यावर बाेढारे यांनीही पलटवार केला आहे. सर्व विषयांना समितीच्या बैठकीत मंजुरी आहे. बैठकीत विषय आले असता तेव्हा काय झोपा काढत होत्या काय, असा सवाल त्यांनी केला. सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून चुकीचे आरोप करणाऱ्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला.
कोरोना काळात मुलींना प्रशिक्षण देण्याच्या नावे १५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप महिला व बाल कल्याण समिती सदस्या राधा अग्रवाल यांनी केला होता. त्यावर बोढारे यांनी आज पत्रकार परिषदेत संपूर्ण व्यवहार व प्रक्रियेची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, वर्ष २०१९-२० चा निधी आहे. त्यावेळी भाजपची सत्ता होती. मार्च संपत असल्याने त्यांच्या काळातच अंतिम करण्यात आलेल्या याद्यांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. ७१४ मुलींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. कोरोना असल्याने त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. तसे पत्र शासनमान्यता असलेल्या एमकेसीएलने काढले. चार टप्प्यात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून चार टप्प्यात परीक्षा घेण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प ३० लाखांचा होता. शासनाच्या आदेशानुसार त्यांना पहिल्या टप्प्यात १५ लाख देण्यात आले. तर उर्वरित १५ लाख रुपये हे वर्ष २०२०-२१ मध्ये देण्यात आले. त्यामुळे यावर्षी खर्च दिसत आले. सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात आली. सर्व विषय बहुमताने मंजूर आहे. अग्रवाल यांचे आरोप बिनबुडाचे असून फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेत, असे बोढारे म्हणाले. यावेळी हिंगणा तालुका अध्यक्ष प्रवीण खाडे- पाटील उपस्थित होते.