जि.प. सदस्य सव्वालाखे यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:40+5:302021-07-07T04:09:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : नागपूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या महासचिवासह अन्य सहा जणांनी काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे ...

Z.P. Member Savvalakhe beaten | जि.प. सदस्य सव्वालाखे यांना मारहाण

जि.प. सदस्य सव्वालाखे यांना मारहाण

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : नागपूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या महासचिवासह अन्य सहा जणांनी काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण केल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पाेटनिवडणुकीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गालबाेट लागले. हा वाद ‘एबी फाॅर्म’वरून उद्‌भवल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात जिल्हा परिषद सदस्य जखमी झाले असून, त्यांना नागपूर शहरात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. शिवाय, पाेलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे नाेंदविले असून, कुणालाही अटक केली नाही. ही घटना पारशिवनी शहरात साेमवारी (दि. ५) दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी काॅंग्रेस कमिटीचे महासचिव उदयसिंग ऊर्फ गज्जू यादव, रा. वाहिटोला, ता. रामटेक, त्यांचा भाऊ रणवीर यादव, सचिन खागर व अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाराम सव्वालाखे हे जिल्हा परिषदेत नगरधन (ता. पारशिवनी) सर्कलचे प्रतिनिधित्व करतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असल्याने तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते, काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या पारशिवनी शहरातील जनसंपर्क कार्यालयात गाेळा झाले हाेते.

काही पदाधिकारी व कार्यकर्ते दुपारी २ वाजेच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गेले तर जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, बबलू बर्वे, प्रफुल्ल कावळे, गोपाळ बुरडे यांच्यासह १५ कार्यकर्ते कार्यालयात बसून हाेते. तत्पूर्वी राजेंद्र मुळक कार्यालयातून नागपूरच्या दिशेने रवाना झाले हाेते. दरम्यान, उदयसिंग यादव, रणवीर यादव, सचिन व इतर तिघे कार्यालयात दाखल झाले. उदयसिंग यादव यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यासह इतरांनी दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार कार्यकर्त्यांसह नागरिक बघत हाेते. यात दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी दुधाराम सव्वलाखे यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध भादंवि ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

‘एबी फाॅर्म’ वाटपावरून वाद

हा वाद जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना द्यावयाच्या ‘एबी फाॅर्म’वरून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला काॅंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला. राजेंद्र मुळक व दुधाराम सव्वालाखे यांनी पारशिवनीला येण्यापूर्वी रामटेक शहरात उमेदवारांना ‘एबी फाॅर्म’ दिले हाेते. त्यानंतर हा प्रकार घडला. यानिमित्ताने काॅंग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.

Web Title: Z.P. Member Savvalakhe beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.