पेन्शन घोटाळा पोहचला पावणेतीन कोटींवर; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:06 AM2023-01-12T11:06:48+5:302023-01-12T11:09:52+5:30
बोगस बँक खाती गोठविण्यात येणार
नागपूर : जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. सुरुवातीला घोटाळा १.८६ कोटींचा असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र हा घोटाळा २.७५ कोटीवंर गेला आहे. याबाबतचा अहवाल पारशिवनी पंचायत समितीने पोलिसांना सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंचायत समिती स्तरावर करण्यात आलेल्या चौकशीत आणखी १३ बँक खाती बोगस असल्याचे पुढे आले आहे. यामुळे घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. आढळून आलेल्या १३ बोगस खात्यांपैकी अनेकांची खाती ही डबल असून, बहुतांशी खाती ही रामटेक तालुक्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तींची असल्याचे सांगण्यात येते. सर्व बोगस खाती गोठविण्यात यावीत, अशा आशयाचे पत्र प्रशासनाकडून बँकेला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. बोगस खातेदारांची संख्या वाढल्याने या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याऐवजी त्यांच्या नावापुढे आपल्या नातेवाइकाच्या नावे बँक खाते जोडून त्या माध्यमातून महिन्याकाठी लाखोंची पेन्शन उचलण्याचा प्रकार शिक्षण विभागात उघडकीस आला होता. पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिला कनिष्ठ लिपिकेसह सहा जणांना अटक केली आहे.
पेन्शन घोटाळा गतवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आला. त्यावेळी तत्कालीन सीईओ योगेश कुंभेजकर यांनी संबंधित महिला लिपिक सरिता नेवारे हिला निलंबित करून या प्रकरणाच्या तपासासाठी जि. प. स्तरावरील तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित केली. समितीने केलेल्या चौकशीदरम्यान यामध्ये १७ पेन्शन धारकांची खाती बोगस आढळून आली होती.
चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार हा घोटाळा १.८६ कोटींच्या आसपास होता. त्याचवेळी प्रशासनाने ही सर्वच्या सर्व १७ ही बँक खाती गोठविण्याचे पत्र बँकेला दिले होते. समितीच्या प्राथमिक चौकशीअंती यातील मुख्य सूत्रधार आरोपी सरिता नेवारे हिच्याविरुद्ध पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी नेवारे हिने घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केलेली वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता तत्कालीन चौकशी समिती सदस्यांनी वर्तविली होती. त्याचवेळी त्यांनी इतरही काही खाती ही बोगस असल्याचा संशयही व्यक्त केला होता.