जि.प.त झिरो पेंडेन्सी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:11 AM2017-10-03T00:11:44+5:302017-10-03T00:12:01+5:30
प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात. परंतु जि.प. सारख्या प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत जनतेच्या प्रतिक्रिया फारशा समाधानकारक नाही. कारण यंत्रणाच गतिमान नसल्याने, कामेच वेळेत होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व अंतर्गत येणाºया प्रशासकीय यंत्रणेत झिरो पेंडेन्सी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेचा थेट संबंध ग्रामीण भागातील नागरिकांशी येतो. नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कामासाठी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयात यावे लागते. अधिकाºयांकडून संबंधित विषयाची फाईल हाताळण्यात येत नसून विविध कारणे दाखविण्यात येतात. यामुळे प्रलंबित प्रकरणाच्या फाईल्सचा ढिगारा वाढत आहे. जिल्हा परिषदेत हजारांवर फाईल्स प्रलंबित असेल. याचा विकास कामावरही परिणाम होतो. शिवाय जिल्हा परिषदबाबत नागरिकांकडून चांगला संदेश जात नाही. जिल्हा परिषदेची ही प्रतिमा पुसण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘झिरो पेंडेन्सीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सीईओ डॉ. बलकवडे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी सर्व प्रमुखांना प्रलंबित फाईल्स मुदतीत निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर सर्व बीडीओ आणि विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहे. यात त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणाची माहिती घेऊन त्या निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करण्यात येणार आहे. कर्मचाºयांवर असलेला ताण लक्षात घेता ही मुदत ठरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रकरणही निकाली काढण्याची मुदत निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला सीईओ डॉ. बलकवडे याचा अहवाल घेणार आहे.