‘बाऊन्सर्स’ची ‘झुंड’शाही : नागपुरात चित्रीकरणाच्या परिसरात होतेय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:40 AM2018-12-06T00:40:16+5:302018-12-06T00:40:42+5:30
महानायक अमिताभ बच्चन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपराजधानीत आल्यानंतर त्यांची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. विशेषत: चित्रीकरण स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या ‘बाऊन्सर्स’च्या वागणुकीबाबत तर अनेकांमध्ये नाराजी आहे. कुठलाही अधिकार नसताना हे ‘बाऊन्सर्स’ परिसरातील नागरिकांसोबतच येणाऱ्या चाहत्यांच्या ‘मोबाईल’चीदेखील तपासणी करत असून प्रसंगी अरेरावीचीदेखील भाषा बोलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच हा प्रकार असल्याची भावना चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानायक अमिताभ बच्चन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपराजधानीत आल्यानंतर त्यांची एक ‘झलक’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. विशेषत: चित्रीकरण स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात असलेल्या ‘बाऊन्सर्स’च्या वागणुकीबाबत तर अनेकांमध्ये नाराजी आहे. कुठलाही अधिकार नसताना हे ‘बाऊन्सर्स’ परिसरातील नागरिकांसोबतच येणाऱ्या चाहत्यांच्या ‘मोबाईल’चीदेखील तपासणी करत असून प्रसंगी अरेरावीचीदेखील भाषा बोलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचाच हा प्रकार असल्याची भावना चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन सोमवारीच नागपुरात पोहोचले. मोहननगर येथील शाळेत चित्रीकरणाचा ‘सेट’ बनविण्यात आला आहे. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘बाऊन्सर्स’ तैनात करण्यात आले आहेत. शाळेच्या मागील बाजूला जाण्यास शाळेतीलच कर्मचाऱ्यांनादेखील मज्जाव करण्यात आला आहे. मैदानाकडे जाणाऱ्या दुसऱ्या द्वारातून केवळ परिसरातील रहिवासी व विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष ‘पास’ दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. चित्रीकरणाचे स्थळ हे शाळेच्या मागील बाजूच्या मैदानात असून बाजूच्या वस्तीला लागून हा भाग येतो. मात्र तेथील घरांवरदेखील ‘बाऊन्सर्स’ तैनात करण्यात आले आहेत. येथे बाहेरील कुठला चाहता आला तर त्याला उंच जागी जाण्यास मनाई करण्यात येत आहे. सोबतच जर कुणी खिशातून मोबाईल जरी बाहेर काढला तर त्याला ‘बाऊन्सर्स’ थांबवत आहेत.
चित्रीकरणाच्या स्थळाच्या बाहेर एखाद्या सार्वजनिक वस्तीमध्ये मोबाईल वापरण्याचा कुणालाही अधिकार आहे. मात्र ‘बाऊन्सर्स’ त्यावर निर्बंध आणत आहेत. बुधवारी अमिताभ बच्चन चित्रीकरणासाठी आलेच नाही. मात्र तरीदेखील परिसरात कडेकोट बंदोबस्त होता.
नागरिकांना गच्चीवर जाण्यास मनाई
आश्चर्याची बाब म्हणजे या परिसरातील अनेक घरांमध्ये चित्रीकरणाच्या अगोदर ‘बाऊन्सर्स’ने भेटी दिल्या. चित्रीकरणाच्या वेळी घरांच्या गच्चीवर जायचे नाही, अशी सूचना त्यांनी दिली. घरातील लोकांना दिवसा गच्चीवर जाण्यासदेखील मनाई करण्यात येत आहे. जर कुणी गच्चीवर गेला तर त्याच्या पाठीमागे ‘बाऊन्सर्स’ येत असून तेथे कुणीही ‘मोबाईल’ काढला तर त्याला अरेरावीची भाषेचा सामना करावा लागत आहे.
पोलीसदादा तुम्हीदेखील...
या परिसरात सुरुवातीच्या दोन दिवसांत पोलीसदेखील तैनात करण्यात आले होते. काही घरांच्या गच्चीवर पोलीस होते आणि चक्क प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना पोलिसांनी तेथून जाण्यासाठी अक्षरश: धमकावले. एक छायाचित्रकार एका घराच्या गच्चीवर गेला असता पोलिसाने त्याला ‘त्वरित खाली उतर, नाहीतर मी माझ्या पद्धतीने तुला खाली उतरवतो’, या भाषेत फर्मानच सोडले. सार्वजनिक ठिकाणी अरेरावी करणाऱ्या ‘बाऊन्सर्स’ला थांबविण्याऐवजी पोलीस कर्मचारीदेखील तीच भाषा वापरत असल्याचे चित्र दुर्दैवी असल्याचे मत चक्क एका शाळकरी विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.