१ कोटींना गंडवून वाळू ठेकेदार पसार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:32 AM2019-06-01T00:32:29+5:302019-06-01T00:35:28+5:30
शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.
सगरोळी : शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला.गावच्या सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली आहे. याशिवाय या घाटावरील २०० ते २५० ट्रक एका शेतात उभे आहेत. र्पाकिंगसाठीही पैसे देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने पैसे मिळाल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका सदर शेतकऱ्यांने घेतली आहे.
सगरोळी येथील गट क्रमांक ३०५, ३०६, ३०८, ३०९, ३३४, ३३५, ३४९ मध्ये वाळू घाट आहेत. यातील एका घाटाचा लिलाव झाला. हा घाट नांदेड येथील एका ठेकेदाराने मित्रांच्या भागीदारीने घेतला.
जवळपास दीड महिन्याच्या उपशानंतर ठेकेदाराची बक्कळ कमाई झाली. याच दरम्यान देगलूर येथे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बनावट पावत्यांच्या संशयावरुन २८ ट्रक पकडून लाखो रुपये दंडा आकारला. याशिवाय बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी पहिल्याच दिवशी दोन ट्रकवर दंडात्मक तर तहसीलच्या फिरत्या पथकाने दोन दिवसात सहा ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची एकूण रक्कम ५० ते ६० लाखांच्या घरात जाते.
ही रक्कम भरल्याशिवाय ट्रक पुन्हा मिळणार नाहीत, ट्रकमालकही पैसे सोडणार नाही, या भीतीने घाईघाईने ठेकेदाराने रात्रेंदिवस मजुरारवी व जेसीबीद्वारे उत्खनन करीत २०० ते २५० ट्रक वाळूने भरले. आठवडाभरात दोन ते अडीच हजार ट्रक भरले. एका ट्रकला सात ते साडेसात हजार रुपये भरवई ठेकेदार देत असे. याप्रमाणे १५ दिवसाचे ४० ते ५० लाखापेक्षा जास्त गावक-याचे देणे झाले. मजुरांनी व सरपंचांनी दररोज विचारण करु लागले, तेव्हा एक ते दोन दिवसात पैसे देतो, असे सांगून ठेकेदार वेळ मारुन नेई.
एकीकडे प्रशासनाच्या दंडाची रक्कम ५० ते ६० लाख रुपये व मजुरी ४० ते ५० लाख असे एकूण १ कोटींचे देणे झाले होते. एक कोटींचे गंडांत्तर टाळण्यासाठी ठेकेदाराने शक्कल लढविली आणि त्याने ३० मे रात्री साहित्यासह धूम ठोकली.
दरम्यान, सरपंचासह गावक-यांनी घाटावरील एक जेसीबी जप्त करून गावच्या निगरानीत ठेवली.सरपंच,उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांच्या मध्यस्थीने थांबलेले मजुर आता मजुरीसाठी सरपंच व संबंधितांना वेठीस धरत आहेत. आता सर्व गावकरी मिळून ठेकेदाराचा शोध घेत आहेत.
दरम्यान, २०० ते २५० रिकामे ट्रक रमेश मोतीवार यांच्या शेतात उभे आहेत. पार्किगपोटी काही रक्कम देण्याचे आश्वासन ठेकेदाराने मोतीवार यांनाही दिले होते, मात्र खडकूही न मिळाल्याने पैसे दिल्याशिवाय ट्रक सोडणार नाही, अशी भूमिका मोतीवार यांनी घेतली.
सरपंच, तलाठी, ठेकेदार म्हणाले
रेती घाट सुरू झाल्यापासून दर आठवड्याला मजुरांची भरवई मजुरी देण्याचे सर्व गावक-यांच्या समक्ष ठरविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे एक दोन आठवड्याचे पैसे ठेकेदाराने दिले. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून चालढकल करून शेवटी चाळीस ते पन्नास लाख रुपये ठकवून फरार झाला असून गावक-यांच्या नाराजीचा सामना आम्हाला करावे लागत आहे
- व्यंकटराव सिदनोड, सरपंच प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी रेतीघाट ठेकेदारास शासनस्तरावरून तात्पुरते बंद किंवा पूर्णपणे बंद असे कोणतेही नोटीस देण्यात आलेले नाही. दररोज सुरळीत चालू असणारे घाट असे अचानक का आणि कशासाठी ठेकेदार घाट बंद केला आहे. हे त्यांनाच माहित़
-खांडेकर, तलाठी, सज्जा सगरोळीआम्ही रेती घाट बंद केला नाही. आमचे कांही टेक्नीकल अडचणी आहेत. शिवाय सोबतचे सहकारीही स्वत:च्या कामात व्यस्त आहेत. घाटावर देखरेखीसाठी कुणीही नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस घाट बंद ठेवण्यात आला आहे. गावचे पैसे देणे आहे. घाट चालू करताच संपूर्ण पैसे देण्यात येथील गंडवण्याचा येथे प्रश्नच येत नाही़
-सूर्यकांत पवार, सगरोळी रेती घाट ठेकेदाऱ