नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळात मुसळधार पाऊस; विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 12:04 PM2021-09-07T12:04:00+5:302021-09-07T12:08:30+5:30
Rain in Nanded : गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने विष्णुपुरीचे आता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नांदेड : जिल्ह्यातील तब्बल ८० महसूल मंडळात जोरदार पाऊस ( Rain In Nanded ) झाला असून सोमवारी दुपारी सुरू झालेला पाऊस मंगळवारी ही सुरूच होता. जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. त्यात अर्धापुर, भोकर, हदगांव तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने विष्णुपुरीचे आता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ( Heavy rains in 80 circles of the Nanded district )
अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. जिल्हाभरात सखल भागात पाणी साचून नागरिकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झालेय. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव या गावचा संपर्क तुटलाय.
पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.