ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:18 PM2024-11-08T12:18:43+5:302024-11-08T12:21:22+5:30
या प्रकरणी संशयित १० जणांना अटक करण्यात आली असून इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
- मारोती चिलपिपरे
कंधार: लोहा मतदार संघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांच्या प्रचारासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आले होते. कंधार तालुक्यातील कौठा येथे प्रचार सभेसाठी जाताना बाचोटी येथे शंभर ते दीडशे तरुणांच्या जमावाने त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. हातामध्ये काळे झेंडे असलेल्या जमावाने 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा देत हाके यांच्या गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी कंधार पोलिसांनी संशयित १० जणांना ताब्यात घेतले असून इतर १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कंधार तालुक्यातील कौठा येथे ओबीसी नेते हाके जात असताना बाचोटी येथे रात्री साडेआठच्या सुमारास १०० ते १५० आंदोलक तोंडास कपडा बांधून एक मराठा लाख मराठा घोषणा देत रस्त्यात उभे होते. त्यांनी हाके बसलेली चारचाकी गाडी (एम.एच. ५० एल. ३४५) अडवली. त्यानंतर काही जण गाडीच्या बोनेटवर चढले, तर काहींनी मागच्या बाजूच्या काचा फोडल्या. यावेळी ओबीसी कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांनीही घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या.
दरम्यान, पोलीस जमाव पांगवत असताना पोलिसांशी हुज्जत घालून जमावाने 'एक मराठा, लाख मराठा', अशी घोषणाबाजी सुरूच ठेवली. झटापटीत पोलीस अंमलदार यांना जखमी करून जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी कंधार पोलिसांनी ८ रोजी फिर्यादी विकास भगवान कोकाटे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी रघुनाथ हनुमंता धोंडगे, रमेश केशवराव धोंडगे, शिवशंकर मारोतराव धोंडगे, दत्ता गोविंदराव वरपडे, यादव जगन्नाथ वरपडे, दत्ता रामजी धोंडगे, बालाजी रघुनाथ वरपडे, सचिन शिवाजी दूरपडे, हनुमंत शिवाजी दूरपडे, शिवशंकर बळीराम धोंडगे या संशयित १० जणांना ताब्यात घेतले असून व इतर १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सर्व बाचोटी येथील राहणार असून अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले हे करीत आहेत.