नांदेड जिल्ह्यात तेरा दिवसांत १०० कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:20 AM2018-06-27T00:20:15+5:302018-06-27T00:21:10+5:30
चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़
विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयानुसार वेळापत्रक जाहीर करुन कार्यवाही केल्यानंतर कर्जवाटपाला गती मिळाली आहे़ मागील तेरा दिवसांत जिल्ह्यतील २८ बँकांनी सुमारे १०० कोटींचे कर्ज वाटप केले आहे़
दमदार पावसानंतर जिल्हाभरात खरीप पेरण्यांची लगबग सुरु झाली़ मात्र त्यानंतरही पीककर्ज वाटपाला अपेक्षित गती मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती़ एकट्या जिल्हा बँकेला खरिपासाठी १५२ कोटी ८२ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे़ उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील ७ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र संरक्षणाखाली येणार आहे़ मात्र १३ जूनपर्यंत जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील १४ हजार ३६२ शेतक-यांना अवघे ३२ कोटी ५४ लाख म्हणजेच उद्दिष्टाच्या २१ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते़ इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्ज वाटपाची आकडेवारी तर आणखीनच निराशाजनक होती़
जिल्ह्यातील १५ बँकांनी १०० पेक्षाही कमी शेतक-यांना कर्ज वाटप केले होते़ त्यामुळेच खरिपासाठी जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ २८ टक्के कर्ज वाटप झाले होते़ या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवार, १५ जून रोजी तातडीने बँकर्स कमिटीची बैठक घेतली़ या बैठकीत जिल्ह्यातील कर्ज वाटपाचा सविस्तर आढावा घेण्यात आला़ याबरोबरच या प्रक्रियेला गती देण्यासाठी मंडळस्तरावर मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यासाठीचे तालुकानिहाय वेळापत्रकही जिल्हाधिका-यांनी जाहीर केले़ ज्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी आहेत़ त्याबरोबरच मागणी करुनही कर्ज उपलब्ध होत नाही, अशा शेतक-यांनी तालुका उपनिबंधक यांच्यासह सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले़ याबरोबरच माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण यांनीही प्रशासनाशी संवाद साधला़ खरीप हंगामासाठी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी पीककर्ज वाटपासह कर्जमाफी आणि बोंड अळीच्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना तातडीने अदा करण्याचे निर्देश दिले़ या घडामोडीनंतर पीक कर्ज वाटपाला जिल्ह्यात गती मिळाली़ मागील अवघ्या १३ दिवसांत जिल्ह्यातील २८ बँकांनी सुमारे १०० कोटींचे पीककर्ज वाटप केल्याने २९ हजार १३८ शेतक-यांना दिलासा मिळाला आहे़ मात्र कर्ज वाटपाची गती आणखी वाढविण्याची गरज आहे़
---
बँकांसमोर रांगा
पीककर्ज वाटप मंडळस्तरावर करण्याचे प्रशासनाने निश्चित केले़ त्यानुसार वेळापत्रक तयार करुन वाटपाची कार्यवाही सुरु केल्याने या एकूणच प्रक्रियेला गती आली़ सद्य:स्थितीत जिल्हा- भरातील बँकांसमोर शेतक-यांच्या रांगा लागल्याचे चित्र असून, येणाºया दिवसांत पीककर्ज वाटपाच्या या प्रक्रियेला आणखी गती द्यावी लागणार आहे़
---
आणखी गती देणार
खरीप हंगामासाठी शेतक-यांना वेळेत कर्ज पुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे़ या अनुषंगाने तीन बँकांना नोटीस बजावली़ शिवाय बैठका घेवून पाठपुरावा सुरु आहे़ मंडळस्तरावर केलेल्या नियोजनाचेही सकारात्मक परिणाम दिसत आहेत़ शंभर टक्के कर्ज वाटपासाठी आग्रही असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले़