बिटकॉइनच्या नावे १०० कोटींचा गंडा, नांदेडमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:18 AM2018-01-29T05:18:39+5:302018-01-29T05:20:13+5:30
बिटकॉइनच्या नावाखाली जिल्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला असून सुमारे १०० कोटींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नांदेड पोलिसांकडे चौघांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ पोलिसांकडे यासंदर्भात येणाºया तक्रारींचा ओढ वाढत आहे.
नांदेड : बिटकॉइनच्या नावाखाली जिल्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला असून सुमारे १०० कोटींची फसवणूक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नांदेड पोलिसांकडे चौघांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला
आहे़ पोलिसांकडे यासंदर्भात येणा-या तक्रारींचा ओढ वाढत आहे.
गेन बिटकॉइन कंपनीच्या (गेन बिटकॉइन मल्टीलेव्हल मार्केटिंग क्रिप्टोकरन्सी स्कीम) आभासी चलन योजनेत नांदेडमधील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशांत पाटील यांना ५५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आतापर्यंत मंगेश मोतेवार, नितीन उत्तरवार, डॉ़अब्दुल रहमान यांनी तक्रारी दिल्या आहेत़ त्यांच्याकडून बिटकॉइनवर अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवून पासवर्ड घेण्यात आला़
नांदेडमधील गेन बिटकॉइनचे एजंट बालाजी पांचाळ, राजु मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी गेन बिटकॉइनचा संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अमित भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अमोल थोंबाळे यास पोलिसांनी २४ जानेवारीला अटक केली. दोन दिवसांच्या कोठडीनंतर त्याला २६ जानेवारीला जामीन मिळाला.
असा चालतो व्यवहार
केवळ सॉफ्टवेअरचा कोड दिल्यानंतर बिटकॉइन एकमेकांकडे हस्तांतर किंवा विक्री केले जाते़ त्याबाबत खरेदीदार आणि विक्रेता यांनाच माहिती असते़
काय आहे गेन बिटकॉइन?
गेन बिटकॉइन कंपनीचे संपूर्ण भारतात जाळे आहे. त्याद्वारे अब्जावधी रुपये कमावल्यात आल्याचे समजते. कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले जाते.
कोण आहे अमित भारद्वाज?
गेन बिटकॉइनचा संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अमित भारद्वाज सध्या दुबईमध्ये आहे. भारद्वाज याने २००४ मध्ये नांदेडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग पूर्ण केले. नांदेडशी असलेल्या संपर्काचा त्याने
फायदा घेतला.
गेन बिटकॉइन कंपनीच्या पुणे आणि नांदेडमधील एजंट्सनी शहरातील हॉटेलमध्ये काही सेमिनार घेतले. बिटकॉइन सॉफ्टवेअर व गेन बिटकॉइन कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्याला अनेक जण भुलले.