नांदेड शहरात १०१ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:27 IST2019-07-03T00:25:57+5:302019-07-03T00:27:02+5:30
पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

नांदेड शहरात १०१ इमारती धोकादायक
नांदेड : पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा पूर्वीच बजावल्या असल्या तरीही धोकादायक इमारतींची खातरजमा करण्याचे निर्देशही आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.
मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतही आयुक्त लहुराज माळी यांनी तातडीची बैठक घेत शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. उपायुक्त अजितपाल संधू, सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शहरात सर्वाधिक ५२ इमारती वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्या खालोखाल इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८ आणि सिडको कार्यालयांतर्गत १९ इमारती धोकादायक आहेत. शिवाजीनगर आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक इमारत धोकादायक आहे. तरोडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मात्र एकही इमारत धोकादायक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सर्व इमारतमालकांना नोटीस बजावल्या आहेत.
पूरप्रवण क्षेत्रातील मालमत्ताधारकांनाही नोटिसा
पूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या शहरातील चार प्रभागांतर्गत ९८८ मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यात सर्वाधिक मालमत्ताधारक हे वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. येथे ४०९ मालमत्ता पूरप्रवण क्षेत्रात आहेत. इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २७०, सिडको-२५६ आणि शिवाजीनगर-५३ मालमत्ताधारकांचा यात समावेश आहे.