१०४ विविध कार्यकारी सोसायट्या डबघाईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:33+5:302021-07-14T04:21:33+5:30
किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा ...
किनवट - सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत पीक कर्ज देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अनिष्ट तफावतमध्ये गेल्या. त्यामुळे किनवट तालुक्यातील १०४ संस्थांच्या मार्फत खूप कमी कर्जपुरवठा झाल्याने अलीकडच्या काळात या संस्था डबघाईस आल्या.
किनवट तालुक्यात ८५ सेवा सहकारी संस्था व १९ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा १०५ सहकारी संस्था असून ३६ हजार ७६८ सभासद संख्या आहे. या अगोदर सातबारा लावला की सभासद शेतकऱ्यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहा टक्के दराने पीक कर्ज देण्यात येत होते. त्यामुळे बँकेत रेलचेल व्हायची. मात्र बँक डबघाईस आल्याने व्यवहार ठप्प होऊन सेवा सहकारी संस्थेचा सभासद वर्ग राष्ट्रीयीकृत बँकेकडे वळला. केवळ सातबाऱ्यावर होणाऱ्या पीक कर्जाच्या कामांना आता सर्वच कागदपत्रे द्यावी लागत आहेत. कर्ज वाटपाचे सहकारी बँकेचे धोरण संचालक मंडळ ठरवत असत. यातून सभासदांना कर्जाचा पुरवठा बँक करीत होती. आता बँक डबघाईला आल्याने कर्ज वाटप खूप कमी प्रमाणात झाले. त्यामुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली.
किनवट तालुक्यात आदिवासी सहकारी संस्था १९ नोंदणीकृत असून चांगल्या कर्जपुरवठा करणाऱ्या माळबोरगाव, चिखली, मांडवी, इस्लापूर, बोधडी या होत्या. याशिवाय मोहपूर, पाटोदा, राजगड, घोटी, कोठारी (चि.), पार्डी खु., उमरी बाजार, सारखणी, जवरला, मांडवा की., लिंगी, कनकी, कुपटी, जलधरा, बेल्लोरी धा. या आहेत. आदिवासी विविध सहकारी संस्थेचे १२ हजार ७०५ सभासद आहेत. तर नोंदणीकृत ८५ सेवा सहकारी संस्थेचे २४ हजार ६३ सभासद आहेत. एकूण आकडा ३६ हजार ७६८ च्या घरात जातो.
सहायक निबंधक कार्यालय सहकारी संस्था किनवट अंतर्गत एनडीसी बँकेने खरीप हंगाम २०२०-२०२१ मध्ये २९९० सभासद शेतकऱ्यांना १४ कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. सभासदांचा आकडा पाहता आजही १०४ संस्थेच्या ३३ हजार ७६८ सभासदांना पीक कर्जाचा पुरवठा झाला नसल्याचे दिसून येते. नांदेड जिल्हा सहकारी बँकेला चांगले दिवस आणण्यासाठी व अनिष्ट तफावतीमुळे सोसायट्या कर्जपुरवठा करत नसल्याने यापुढे सोसायट्यांनी सहकारी बँकेमार्फत कर्जपुरवठा करून बँकेचे व सहकारी संस्थांचे वैभव पूर्वीप्रमाणेच बहाल करावे अशी मागणी होत आहे.