नॉट आऊट १०५! आजी म्हणतात, 'आजवर सर्व निवडणुकीत केले मतदान, तुम्हीही चुकवू नका'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:00 PM2024-04-26T19:00:48+5:302024-04-26T19:01:28+5:30
एका मताने बदल होतो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी स्वतः तर मतदान केलेच; पण घरातील सर्वांना मतदान करण्यासाठी प्रत्येक वेळी आग्रह केला...
- मारोती चिलपिपरे
कंधार : 'मतदान हे सर्वांत पवित्र कार्य आहे. एक भारतीय म्हणून आपल्याला हा अमूल्य अधिकार मिळालाय. त्यामुळेच आतापर्यंतच्या आयुष्यात एकही मतदान चुकविले नाही', असे कंधार तालुक्यातील गुंटुर येथील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी अभिमानाने सांगितले. भिवराबाई भुजंगराव मुंडकर असे या जेष्ठ मतदाराचे नाव आहे.
गुंटूर येथील १०५ वर्षांच्या भिवराबाई भुजंगराव मुंडकर यांनी वयाची शंभरी ओलांडलेल्या भिवराबाई यांना अजूनही स्पष्ट दिसते. थोडे कमी ऐकू येते; पण त्या चांगल्या प्रकारे संवाद साधतात. एकही मतदान चुकविले नाही. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार? असा कधीच विचार केला नाही. प्रत्येक मत अनमोल असते. एका मताने बदल होतो, याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी स्वतः तर मतदान केलेच; पण घरातील सर्वांना मतदान करण्यासाठी प्रत्येक वेळी आग्रह केला असे भिवराबाई यांनी सांगितले.