‘अटल विश्वकर्मा योजनेत’ हिंगोली जिल्ह्यातील ११२२ कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:11 AM2018-07-11T01:11:21+5:302018-07-11T01:11:37+5:30
राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी दिली.
बांधकाम कामगार असूनही केवळ नोंदणी नसल्यामुळे शासनाच्या योजनांच्या लाभापासून कामगार वंचित राहातात. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने राज्यभरात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत संबंधित बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध २८ कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी विशेष नोंदणी अभियान सुरू केले आहे. ४ जुलैपासून हिंगोली जिल्ह्यात अभियान राबविले जात असून ४ आॅगस्ट २०१८ पर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनेद्वारे शैक्षणिक सहाय्य योजना, तसेच आर्थिक सहाय्य, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पहिली ते सातवी, ७५ टक्के उपस्थिती असल्यास प्रतिवर्षी अडीच हजार, आठवी ते दहावी पाच हजार, दहावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्यास १० हजारांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य केले जाते. २८ योजनांचा लाभ दिला जातो.
---
ंबांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नाव नोंदणीसाठी आवश्यक आहे. तसेच वयाचा दाखला, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह असलेले ओळखपत्र, बँक पासबुकची सत्यप्रत व पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे अशी कागदपत्र जोडून कामगार अधिकाऱ्यांच्या पथकाकडे ही कागदपत्रे जोडून द्यायची आहेत. दगडफोड कामगार, लादी किंवा फरशीची कामे करणारे कामगार, रंग व सुतारकाम, इलेक्ट्रिशियन व इतर कामे, नाले बांधणी प्लंबिंग, अग्निशमन यंत्रणेचे कामे, वातानुकूलितची कामे, सुरक्षा उपकरणांची कामे, जल संचयन व इतर कामे, काचेची कामे, सौरउर्जेशी निगडित कामे, धातूचे दरवाजे व खिडक्यांची कामे करणारे, विटांच्या कौलाची कामे, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरणांची कामे यासह विविध कामे करणाºया कामगारांचा यात समावेश आहे.