१८ वर्षांपूर्वीच्या भोकर दंगलीतील ११७ आरोपींची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:03 PM2018-09-28T14:03:17+5:302018-09-28T14:05:16+5:30
श्री दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवेळी भोकर शहरात २००१ मध्ये दोन धर्मियांमध्ये दंगळ उसळली होती.
भोकर (नांदेड) : श्री दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवेळी भोकर शहरात २००१ मध्ये दोन धर्मियांमध्ये दंगळ उसळली होती. या प्रकरणातील ११७ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. निकालानंतर दोन्ही धर्मियांनी न्यायालयातच गळाभेट घेवून समाधान व्यक्त केले.
भोकर शहरात दूर्गादेवी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. २००१ मध्येही शहरात विविध ठिकाणी दूर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. देवीच्या स्थापनेनंतर दहा दिवसांनी उत्साहात विसर्जन मिरवणूक निघाली असता २८ आॅक्टोबर २००१ रोजी सराफा गल्लीत दोन धर्मियांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान दंगलीत झाले. या दंगली प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या तक्रारीवरून भोकर पोलिसात दोन्ही धर्मियांच्या ११७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करुन तत्कालीन पो.नि. वसंत सुंबुटवार यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने ७७ पैकी ७ जणांची साक्ष तपासली़ साक्षीदार बहुसंखेने असल्यामुळे या प्रकरणास विलंब होवून खटला १८ वर्षे चालला. अखेर गुरुवारी २७ सप्टेंबर २०१८ रोजी न्या. एस.एम. शेख यांनी निकाल देत सबळ पुराव्याअभावी सर्वच ११७ जणांची निर्दोष मुक्तता करुन सदर प्रकरण निकाली काढले. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता रमेश राजूरकर तर बचाव पक्षातर्फे संदीप कुंभेकर, दीपक भातलवंडे, बी.डी.कुलकर्णी, महंमद सलीम, शेख अल्तमश यांनी काम पाहिले.