मंदिराच्या ओट्यावर बसल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 22:22 IST2024-09-23T22:22:08+5:302024-09-23T22:22:20+5:30
याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मंदिराच्या ओट्यावर बसल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा...
शेख शब्बीर- देगलूर: मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत गावातील बारा आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मौजे कोकलगाव येथे 2015 मध्ये घडली होती. याप्रकरणी बिलोलीच्या न्यायालयाने यातील बाराही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली
आहे.
19 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी तथा मयताचा भाऊ चंद्रकांत तुकाराम सूर्यवंशी वय 45 वर्ष जात मांग राहणार कोकलगाव तालुका देगलूर हा गावातील वीरभद्र मंदिराच्या ओट्यावर बसला होता.यावेळी गावातीलच आरोपी 1) निळकंठ जगन्नाथ पाटील वय 44 2) सोमनाथ होणयप्पा स्वामी वय 53 3) हनमंत हावगी स्वामी वय 30 4) शंकर संगप्पा स्वामी वय 38 5) अमृत आनेप्पा बिरादार वय 53 6) शिवाजी रामचंद्र मदने वय 44
7) गणेश नागनाथ हत्ते वय 32 8) शंकर सिद्राम हत्ते वय 47 9) सुरेश माधवराव कवटगे वय 48 10) जगन्नाथ हनमंतराव पाटील वय 68
11) सुभाष संगप्पा हत्ते वय 57 12) सुनील मलिकार्जुन पाटील वय 32 हे तेथे येऊन तू हलक्या जातीचा आहेस त्यामुळे तू मंदिराच्या ओट्यावर का बसलास असे म्हणत त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
आपल्या भावाला मारहाण होत असल्याचे पाहून मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी व विठ्ठल महादेव मदने हे भांडण सोडविण्यासाठी आला असता वरील सर्व आरोपींनी मयत मारोती तुकाराम सूर्यवंशी यास दगडाने डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची फिर्याद मयताचा भाऊ चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मरखेल पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून सर्व 12 आरोपी विरुद्ध कलम 302,143,147,148,149,324 भा द वि आणि सहकलम 3(1) (10) 3 (2) (5) ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आल्याने सरकारतर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात येऊन न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून यातील बारा आरोपींना कलम 302 भादवी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 148 भादवि अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दंड प्रत्येकी 5000 रुपये तसेच कलम 3(1) (10) अंतर्गत एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंडाच्या रकमेतून मयतांच्या वारसांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश -1 तथा अति.सत्र न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी दिला आहे.सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून साईनाथ एमेकर यांनी सहकार्य केले.