अग्निशमन दलाकडून उपलब्ध यंत्रणेद्वारे १२१ मोहिमा फत्ते; मोठ्या बंबाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:59 PM2020-11-28T18:59:51+5:302020-11-28T19:01:36+5:30
एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ २१ कर्मचारीच आहेत.
नांदेड : शहरातील आगी आटोक्यात आणण्याची धुरा नांदेड महापालिका अग्निशमन दलातील २१ कर्मचाऱ्यांवर आहे. तर सिडकोमध्ये एमआयडीसी परिसरात स्वतंत्र केंद्र असून तिथे १३ कर्मचारी कार्यरत आहेत. जीवाची बाजी लावत योग्य वेळेत पोहोवून आग आटोक्यात आणण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न राहिला आहे. मागील वर्षभरात महापालिकेच्या अग्निशमन दलाने जवळपास १२१ आगी आटोक्यात आणण्याचे काम केले आहे.
नांदेड शहरात उद्योग, धंदे मोठ्या प्रमाणात असून मनपाच्या अखत्यारित सर्वाधिक प्रमाणात कापड, स्टेशनरी, फर्निचर साहित्य आदीची दुकाने आहेत. शहरात आगीच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अग्निशमन दलास कायमच सतर्क रहावे लागते. परंतु, एवढ्या मोठ्या शहरासाठी केवळ २१ कर्मचारीच आहेत. वाहन चालकासह फायर मॅन, लीड फायर मॅन असे जवळपास १४ पदे रिक्त आहेत. सिडकोत एकच बंब असून कर्मचार्यांची संख्या जवळपास १३ आहे. शहरातील आगीची संख्या पाहता साहित्य आणि कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज आहे.
आगीच्या १२१ घटना
नांदेड शहर व परिसरात घडलेल्या वर्षभरातील जवळपास १२१ ठिकाणच्या आगी विझविण्याचे काम अग्निशमल दलाने केले आहे. त्यात अनेक ठिकाणी २० मिनिटाच्या आत पोहोचण्याचे रेकॅार्डही अग्निशमन दलाने केलेले आहे. यामध्ये वर्षभरातील सर्वात मोठी असलेली लातूर फाट्यावरील आग वेळेत विझविली होती.
अत्याधुनिक साहित्याचा अभाव
नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे फायर टेंडर, क्यूआरव्ही (देवदूत), फायर बुलेट यासह इतर यंत्र सामग्री उपलब्ध आहे. येथे ब्राऊझर फायर टेंडर (मोठा बंब) ज्यात १२ हजार लिटर पाणी बसेल, अशा बंबाची कमतरता आहे. तर सिडकोत एकच बंब आहे. एमआयडीसी असल्याने आणखी बंब वाढविण्याबरोबर अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा अभाव
महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशमन अधिकारी शेख रईसपाशा यांच्यासह २१ कमर्मचार्यांचा समावेश आहे. याठिकाणी वाहनचालक, फायर मॅन अशा कर्मचार्यांचा अभाव आहे. नवीन नांदेडच्या एमआयडीसी परिसरात नव्याने सुरू केलेल्या केंद्रात जवळपास १३ कर्मचारी असून इतर रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
नांदेड शहर व परिसरात घडलेल्या आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. उपलब्ध मणुष्यबळावर आम्ही दोन शिफ्टमध्ये काम करतो. परंतु, कर्मचार्यांचे समर्पण आणि नियोजनामुळे बहुतांश ठिकाणी वेळेत पाेहोचून आग विझविण्यात यश मिळालेले आहे.
- शेख रईस पाशा, अग्निशमन अधिकारी, मनपा.