जिल्ह्यात १३ हजार लाभार्थी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:17 AM2021-02-12T04:17:34+5:302021-02-12T04:17:34+5:30
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल ...
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे, तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घराचे काम रखडल्याने आता राहायचे कसे, असा प्रश्न या लाभार्थ्यांपुढे उभा राहिला आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४८ हजार ९२५ घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात ४४ हजार २०४ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. या घरकुल लाभार्थ्यांना चार टप्प्यांत अनुदान वितरित केले जात आहे. घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये ग्रामीण भागात दिले जात असून घरकुल मंजुरीनंतर १५ हजार रुपये ॲडव्हान्स उपलब्ध करून दिले जात आहे. पायाभरणीनंतर दुसऱ्या टप्प्यातील ४५ हजार, तिसऱ्या टप्प्यातील ४० हजार आणि काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार असे अनुदान वाटप केले जात आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १८ हजार ६५१ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून २९ हजार ५१३ घरांचे काम अपूर्ण आहे. घरकुल पूर्ण होण्याची टक्केवारीही ३९ टक्के इतकीच आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना आपले घर पूर्ण कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ४४ हजार १८७ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे तर आणखी ३० हजार ७३८ घरकुलांना ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. ३४ हजार ५२६ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही १३ हजार ११२ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यानंतर आनंद झाला. कामही सुरू केले. पहिला हप्ता मिळाला, पण आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वी काम करण्याची घाई झाली आहे. परंतु हातात पैसेच नसल्याने काम करायचे कसे, असा प्रश्न समोर आहे. ऊन, वाऱ्यापासून संरक्षण करायचे कसे? आहे ते घरही नव्या घरकुलासाठी पाडून ठेवले आहे.
- जमुनाबाई सुरेवाड, हदगाव
खेड्यामध्ये राहणाऱ्या गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मोलाची आहे. या योजनेअंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. अखेर यादीत नाव आले. कामही सुरू केले. जिल्ह्यातील वाळूचे भाव गगनाला भिडल्याने सुरुवातीपासूनच काम हळूहळू होत आहे. त्यात सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचेही चार टप्प्पे करण्यात आले आहेत. त्यामुळे काम गतीने पूर्ण होईना. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी तालुकास्तरावर वारंवार फेऱ्या मारूनही निराशाच येत आहे.
- सुलोचना वाघमारे, नरसी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना झालेल्या कामानुसार अनुदान वितरित करण्यात येत आहे. घराचे काम ज्या टप्प्यात पूर्ण झाले आहे त्या टप्प्यापर्यंतचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. सुरुवातीला निधीचा प्रश्न होता. परंतु तो आता सुटला आहे. आता लगेच लाभार्थ्यांना कामानुसार पैसे दिले जात आहेत. विशेष म्हणजे हे अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट खात्यात जमा केले जात असल्याने तक्रारी कमी झाल्या आहेत.
-डॉ. शरद कुलकर्णी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
डोक्यावरील छप्पर गेल्याने हाल
ग्रामीण भागात घरकुलांसाठी लाभार्थ्यांनी राहते घर पाडले आहे. नव्या घराचे काम अर्धवट असल्याने आता लाभार्थ्यांना चिंता लागली आहे. बांधाकाम साहित्याचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी तसेच वाळूही उपलब्ध होत नसल्याने कसेबसे करत काम सुरू आहे. योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झाला असला तरीही दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतु सध्या तोडक्या-मोडक्या घरातच गुजराण करावी लागत आहे.