लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 05:42 PM2019-03-11T17:42:45+5:302019-03-11T18:05:18+5:30
मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़
मुखेड : मुखेड तालुक्यातील तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबाच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़
महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इ.स. १९८४ मध्ये लेंडी धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वषार्पासून लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रंस्तांच्या वतीने अनेक विविध आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़ तसेच २०१८ मध्ये या लाभधारकांनी मावेजा मिळावा म्हणून बेमुदत उपोषणही केले होते.
दरम्यान मागील ३ वर्षात या प्रकल्पासाठी शासनाकडून १७६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ १ नोव्हेंबर २०१८ रोजी जलसंपदामंत्री यांनीही मावेजाची रक्कम तातडीने देण्याबाबतचा शब्द विधिमंडळात दिला होता़ त्यानुसार १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटीच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक १ मधील माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मीनबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रामाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या नोटिसा बजावून आॅनलान पद्धतीने मावेजाही देण्यात आला. दरम्यान या प्रक्रियेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून मुखेड व मुक्रमाबाद येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला़