नांदेडच्या १४ वर्षीय शेतकरी कन्येचं अमेरिकेत विमानउड्डाण; कोंढा गावाने साजरा केला आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:31 AM2021-06-26T07:31:57+5:302021-06-26T07:32:03+5:30
अनोखी कामगिरी करून रेवाने सगळ्यांना केले चकित; कोंढा गावाने साजरा केला आनंदोत्सव
- गोविंद टेकाळे
नांदेड : ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे...’ या उक्तीचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावच्या एका शेतकरी कुटुंबातील अवघ्या १४ वर्षीय कन्येने आपल्या अनोख्या कामगिरीतून दिला आहे. कोंढा या गावच्या जोगदंड कुटुंबातील १४ वर्षीय रेवा या कन्येने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे. तिच्या या कामगिरीची माहिती मिळताच कोंढा गावात आनंदोत्सव साजरा होत असून नांदेडकरांचा ऊर भरून आल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
कोंढा येथील रहिवासी केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (स्ट्रिंग कंट्रोल्ड) दोरीवर विमान उडवून दाखविण्याविषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. यातूनच त्यांची मुलगी रेवा जोगदंड हिलाही प्रेरणा मिळाली. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली; आणि हे स्वप्न सत्यात उतरविले.
रेवा जोगदंड हिने २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे. तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला.
इतक्या लहान वयातही रेवाने विमान चालविले, याचा नक्कीच अभिमान आहे. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या बळावर बालवयातही तिने विमान चालविले. प्रत्येक स्त्रीने स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता कायम ठेवली तर यश संपादन करता येते.
- शंकरराव कदम, पोलीस पाटील, कोंढा