हदगाव तालुक्यात १४० डीपी नादुरुस्त,८० जळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:15 AM2018-09-21T01:15:45+5:302018-09-21T01:16:03+5:30
तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़
तालुक्यात (१२) ३३ केव्ही विद्युत केंद्र आहेत़ तळणी, हदगाव, ल्याहरी, तामसा, मनाठा, बरडशेवाळा, निवघा, कोळी, लोहा-डिग्रस व घोगरी, आष्टी या ठिकाणी ही केंद्रे आहेत़ घरगुती व कृषीपंपाचे एकूण ३३ हजार ग्राहक आहेत़ हदगाव शहर ५ हजार ९००, ग्रामीण ४ हजार ५००, तळणी ३ हजार, आष्टी ३ हजार ५००, मनाठा ३ हजार ५००, तामसा ४ हजार, निवघा ४ हजार अशी ही संख्या आहे़
तळणी-निवघा या बाजुला थ्रीफ्रेज विद्युत मिळतो़ लोडशेडींग सोडून तर तामसा, मनाठा, हदगाव शहर सिंगल फेज विद्युत भारनियमन सोडून मिळतो़ परंतु मागील पावसात, वादळामुळे सिंगल फेज व थ्री फेज मिळून १४० रोहीत्र नादुरुस्त झाले आहेत़
८० रोहीत्र जळाले़ आता याची दुरुस्ती करून देणयाची जबाबदारी रोहीत्र पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असते़ दोन वर्षाची गॅरंटी असते व या एजन्सी आपली कर्तव्य बजावतात़ परंतु या दुरुस्तीसाठी विद्युत केंद्रांनी त्यांना आॅईल पुरविणे बंधनकारक असते़ परंतु भोकर डिव्हीजनला आॅईलच उपलब्ध नसल्याने रोहीत्राची नादुरुस्ती रखडली व या संख्येतही वाढ झाली़ याबाबत तताडीने कार्यवाहीची मागणी होत आहे़
- नवीन डीपीसाठी शेतकरी वर्गणी जमा करून कोटेशन भरतात़रोहीत्र मिळत नाही़ कधी तीन वर्ष तर कधी पाच वर्षाचा कालावधी लागतो़ तोपर्यंत शेतकरी थांबत नाहीत़ उपलब्ध डीपीवरच जोडणी घेतली जाते़ त्यामुळे भार वाढून रोहीत्र जळते. वाढीव तापमान हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले.
आष्टीकरांचे बावनकुळे यांना साकडे
रोहीत्र जळाल्याने ताबडतोब मिळत नाही़ मागणीच्या तारखेपासून डीपी मिळतो़ आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने विजेचा भार वाढला़ त्यामुळे पूर्वीचे नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करून मिळावे म्हणून विभागावर दबाव येत आहे़लोकप्रतिनिधी यासाठी वरिष्ठ अधिका-यांना धारेवर धरत आहेत़ आ़नागेश पाटील यांनी वीज समस्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली़ मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठांशी संवाद साधला़