१४० गावांनाच भेटी देवून जिंकली निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:31 AM2019-04-02T00:31:06+5:302019-04-02T00:32:17+5:30
राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी जनता दलाचे डॉ़ व्यंकटेश काब्दे विजयी झाले़ केवळ सहा लाख रूपये खर्च करून आणि बाराशे पैकी १४० गावांनाच भेटी देवून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी ही निवडणूक जिंकली़
भारत दाढेल।
नांदेड : राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा प्रतिसाद यामुळेच १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत २४ हजार मतांनी जनता दलाचे डॉ़ व्यंकटेश काब्दे विजयी झाले़ केवळ सहा लाख रूपये खर्च करून आणि बाराशे पैकी १४० गावांनाच भेटी देवून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी ही निवडणूक जिंकली़
१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा केलेला पराभव त्यावेळी राज्यात चांगलाच गाजला होता़ या निवडणुकीच्या आठवणी सांगताना डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, १९८७ मध्ये नांदेड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी विजय संपादन केला होता़ मात्र १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माझ्या सारख्या नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला़ अमेरिकेतून त्यावेळी मी नुकताच नांदेडला आलो होतो़ घरात कोणताही राजकीय वारसा नव्हता़ आणि राजकारणाचाही मला गंध नव्हता़ मात्र सामान्य नागरिकाने राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे़ मी तर डॉक्टर होतो़ असा विचार माझ्या मनात आला़ ही गोष्ट माझ्या पत्नीला सांगितली़ तीने होकार दिला़ मात्र माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी या गोष्टीला विरोध केला़ विद्यमान खासदार अशोक चव्हाण समोर असताना त्यांना पराभूत करणे हे सोपे नाही, असा सल्ला त्यांनी दिला़ मात्र माझा निर्णय कायम होता़ त्यावेळी व्ही़ पी़ सिंग यांचे नाव देशभर चर्चेत आले होते़ त्यामुळे मी जनता दलाकडून इच्छुक होतो़ त्यासाठी माझ्या घरी एक बैठक घेतली़ भोजालाल गवळी यांनी मला प्रोत्साहन दिले़ उमेदवार निवडीसाठी जनता दल पक्षाने एक समिती स्थापन केली होती़ त्यामध्ये गंगाधर पटने होते़ ते सुद्धा उमेदवारीच्या स्पर्धेत होते़ त्यांचे आणि माझे नाव अखेर पर्यंत चर्चेत होते़ उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच होती़ मात्र माझे नाव फायनल होते़ पत्नीने बचत केलेले दोन लाख रूपये, मित्रांनी मदत म्हणून दिलेले दोन लाख रूपये आणि २ रूपययांचे कर्ज काढून मी लढलो़ प्रचाराची यंत्रणा तोकडीच होती़ वाहने मोजकेच होते़ त्यामुळे कार्यकर्ते जमेल तसे स्वत:च खर्च करून माझा प्रचार करू लागले़
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात निवडणूक लागल्याने थंडीचे दिवस होते़ कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत माझा प्रचार करायचे़ रात्री उशीरा येवून माझ्या घराच्या अंगणात झोपी जायचे़ त्यावेळी १ हजार २०० गावे मतदार संघात होते़ मात्र मी १४० गावातच पोहचू शकलो़ माझे निवडणूक चिन्ह चक्र होते़
लोकांनी लिंबाच्या पाल्याने आपल्या घराच्या भिंतीवर चक्र ही निशानी काढली होती़ लोकांचे हे प्रेम पाहून मी भारावलो होतो़ त्यामुळे या निवडणूकीत मी नव्हे तर लोक उभे होते़ ही निवडणूक सर्वसामान्य लोकांची होती़
प्रचार काळात बापुसाहेब काळदाते, भाई वैद्य, सदाशिवराव पाटील, गुरूनाथ कुरूडे आदींनी सभा घेवून माझा प्रचार केला़ तर १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान व्ही़ पी़ सिंग, माजी पतंप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी पंतप्रधान दैवेगोडा या तिघांनी सभा घेतल्या होत्या़
निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकली निवडणूक
१९८९ ची लोकसभा निवडणुकीत राजकारणाची कोरी पाटी असलेल्या डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी काँगेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला़ डॉ़ व्यंकटेश काब्दे यांना २ लाख ७८ हजार ३२० तर अशोक चव्हाण यांना २ लाख ५४ हजार २०७ मते मिळाली़ २४ हजार ११३ मतांनी ही निवडणूक डॉ़ काब्दे यांनी जिंकली़ विशेष म्हणजे डॉ़ काब्दे यांना नांदेड शहरातून सर्वाधिक मते मिळाली होती़ साधनांची कमतरता असतानाही निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक डॉ़ काब्दे यांनी जिंकली होती़ वैद्यकीय क्षेत्रासोबतच डॉ़ काब्दे यांनी राजकारणातही यश मिळविले़
प्रचारासाठी जात असताना झाला होता अपघात
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मी आणि माझे सहकारी पहाटेच जीपने अहमदपूरकडे निघालो़ लोह्याच्या पुढे एका वळणावर आमच्या जीपला अपघात झाला़ जीप पूर्ण पलटी झाली होती़ जीप मध्ये बसलेला आम्ही चार, पाच जन कसे बसे बचावलो़ सगळ्यांना मार लागला़ मात्र त्याही अवस्थेत आम्ही पुन्हा दुसऱ्या वाहनाने अहमदपूरकडे निघालो़ अपघाताची वार्ता सर्वदूर गेली़ काहींनी तर या अपघातातून आम्ही वाचलो याचा अर्थ आम्ही विजयी होणार, असाही लावल्याचे डॉ़ काब्दे यांनी सांगितले़