प्रवाशांअभावी १६५ बसेसला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:52+5:302021-06-18T04:13:52+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातून दररोज ४६३ नियते नियमितपणे चालविली जात होती. परंतु मार्च २०२० मध्ये कोरोना ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातून दररोज ४६३ नियते नियमितपणे चालविली जात होती. परंतु मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने देशात अन् राज्यातही लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जवळपास १८० दिवसांहून अधिक कालावधीसाठी एसटी जागेवरच थांबली. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने विविध नियम व अटी घालून प्रवाशांची वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, १ जूनपासून अनलॉक प्रक्रिया झाली असून सर्वच नियते सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परंतु ग्रामीण भागात पेरण्या सुरू असल्याने आणि शाळा, महाविद्यालये बंद असल्याने जवळपास १६५ बस बंद आहेत. त्यात मानव विकास मिशन अंतर्गतच्या ६३ बसेसचा समावेश आहे.
ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी मागील दीड वर्षांपासून अनेक गावपाड्यांवर पोहचली नाही. ग्रामस्थांची मागणी असतानाही प्रवाशांअभावी नियमितपणे बस चालविणे एसटी प्रशासनाला परवडणारे नाही. त्यामुळे गावखेड्यातील बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आजघडीला नांदेड विभागातून २९८ नियते चालविली जात आहेत. त्यातून दररोज सरासरी ३० ते ३२ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. यातून नियमित होणारा खर्च अन् पगार निघणेही कठीण झाले आहे.
चौकट .........
ग्रामीण भागातील दळणवळणाला अडथळा
ज्या ठिकाणी रेल्वे अथवा खासगी वाहने पोहचली नाहीत, अशा ठिकाणीही एसटी बससेवा पोहचली. त्यामुळेच लालपरीला ग्रामीण भागाची रक्त वाहिनी म्हणून संबोधले जाते. परंतु कोरोना महामारीनंतर अनेक गावखेड्यातील बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट, माहूर हिमायतनगर आदी तालुक्यातील गावपाड्यांमध्ये नागरिकांना दळणवळणासाठी पर्यायी वाहनांचा शोध घ्यावा लागत आहे.
चौकट .........
एसटीला माल वाहतुकीचा आधार
कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटी प्रशासनाने माल वाहतुकीवर भर दिला आहे. नांदेड विभागात असणाऱ्या १५ बस ट्रकच्या माध्यमातून मागील महिनाभरात २३ लाख ८४ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न नांदेड विभागाला मिळाले आहे. त्यात अकोला, बुलडाणा, रत्नागिरी, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी शेतमाल व इतर मालाची वाहतूक करण्यात आली आहे.
एसटी पार्सल सुविधाही पुरविणार
मालवाहतुकीला मिळणारा प्रतिसाद पाहता एसटी महामंडळाकडून आता कुरिअर सेवाही दिली जाणार आहे. ही सेवा गावखेड्यापर्यंत चालविण्याचा विचार एसटी प्रशासन करीत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्न बरोबर इतर उत्पन्नाचे स्त्रोत एसटी महामंडळाकडून निर्माण केले जात आहे.