नांदेड शहरात सहा दिवसांत १,६८६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:02+5:302021-03-15T04:17:02+5:30
मागील सहा दिवसांतील आकडेवारी पाहिली असता, नांदेड जिल्हा आणि शहरातील बाधित रुग्णांची संख्या कशा पद्धतीने वाढत आहे, याचा अंदाज ...
मागील सहा दिवसांतील आकडेवारी पाहिली असता, नांदेड जिल्हा आणि शहरातील बाधित रुग्णांची संख्या कशा पद्धतीने वाढत आहे, याचा अंदाज येतो. मंगळवार, ९ मार्च रोजी १४३२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातील २२५ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. बुधवार, १० मार्च रोजी १,१३६ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यातील २१९ अहवाल पॉझिटिव्ह आले. गुरुवार, ११ मार्च रोजी १,५६० तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील २५० तपासण्या पॉझिटिव्ह आल्या. शुक्रवार, १२ मार्च रोजी ९९३ चाचण्यापैकी ३६० अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी तर कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवसात तब्बल ५५१ जणांचे अहवाल बाधित असल्याचे पुढे आले, तर रविवारी पुन्हा ५६६ अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे चित्र चिंताजनक झाले आहे, म्हणजेच मागील अवघ्या सहा दिवसांत जिल्ह्यात २,२११ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकट--------------
नांदेड शहरातील स्थिती चिंताजनक
९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या २२५ पैकी १५२ जण नांदेड मनपा हद्दीतील होते. त्यानंतर, १० मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या २१९ पैकी १५७ जण नांदेड शहरातील होते. गुरुवारी पुन्हा शहरातील बाधित रुग्णांची संख्या वाढली. २५० पैकी १८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी जिल्ह्यातील ३६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये केवळ मनपा हद्दीतील ३०० जणांचा समावेश होता. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या ५९१ पैकी तब्बल ४७३ जण नांदेड मनपा हद्दीतील होते, तर रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या ५६६ जणांपैकी तब्बल ४१५ जण हे नांदेड मनपा हद्दीतील आहेत.