निधी १७ कोटी, कामे २५ कोटींचे!; नांदेड महापालिकेच्या प्रस्तावाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:06 PM2018-01-09T17:06:51+5:302018-01-09T17:07:15+5:30
महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नांदेड : महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत नांदेड महापालिकेला १६ कोटी ८६ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीतून तत्कालीन महापौर शैलजा स्वामी यांनी जवळपास २५ कोटींच्या कामाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविले होते. निधीपेक्षा जादा रक्कमेचे प्रस्ताव पाठविताना त्यांना कोणीही आडकाठी आणली नव्हती.
दलितवस्ती निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत या तक्रारी पोहोचल्या. या सर्व घडामोडीत निवडणुका लागल्या. आयुक्त गणेश देशमुख यांनी पावसाळ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दलित वस्तीतून प्रामुख्याने शहरातील मोठ्या नाल्यांची कामे सुचवली. या कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मंजुरी दिली. मात्र पूर्वी जिल्हाधिकार्यांकडे पाठविलेल्या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न रावत यांनी उपस्थित केला आहे.
दलितवस्ती निधीतून ३१ कोटींची कामे मंजूर
शहरात दलितवस्ती विकास निधीतून ३१ कोटींच्या कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष शहरात फिरुन ही कामे सुचवली आहेत.आवश्यक तीच कामे दलितवस्ती निधीतून घेण्यात आली आहेत. या निधीतून कामे निश्चित करण्याचे अधिकार हे प्रशासनाचेच आहेत. आतापर्यंत पदाधिकार्यांनी त्याचा वापर केला. हा पायंडा मोडीत काढीत नियमानुसार काम करण्यात आले आहे. मंजूर झालेले प्रस्तावही नियमानुसारच आहेत. त्यात कोणताही बदल आता होणार नाही.
- गणेश देशमुख, (आयुक्त, महापालिका)