१७०० जात प्रमाणपत्रांचे पडताळणी प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:25 PM2020-02-14T19:25:05+5:302020-02-14T19:38:55+5:30
उच्च शिक्षणासाठीच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट
नांदेड : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाणवा असल्याने प्रमाणपत्र पडताळणीसाठी विलंब लागत असून शैक्षणिक विभागाचे १ हजार ७१८ प्रमाणपत्र प्रलंबित आहेत़
उच्च शिक्षणासाठी तसेच विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे़ शासनाने जात प्रमाणपत्रांची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन केली आहे़ महा- ई - सेवा केंद्रात आवश्यक कागदपत्रे जमा करून तेथूनच दाखला डाऊनलोड करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ पण जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर सदर प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे़ या कार्यालयात असलेले संशोधन अधिकारी तथा समिती सदस्य सचिव यांच्याकडेच पडताळणीचे काम सोपविले आहे़ दक्षता समितीवर डीवायएसपी, पोलीस निरिक्षक, फौजदार, पोलीस शिपाई यांची नियुक्त केली असली तरी या समितीवर सध्या एक पोलीस शिपाई व पोलीस निरिक्षकाकडे डीवायएसपीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे़ तसेच एक सिनियर क्लार्कचे पद रिक्त असून १० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत़ दिवसेंदिवस शैक्षणिक, सेवापूर्व, सेवातंर्गत, निवडणूक, जात दाखल्याची अपील प्रकरणे, तक्रार प्रकरणे व इतर प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यात कर्मचारी कमी असल्याने प्रलंबित प्रमाणपत्रांची संख्या अधिक होत आहे़
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी अत्यावश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचे डिसेंबर २०१९ अखेर २ हजार ८६९ प्रकरणे प्रलंबित होते़ ३१ जानेवारी अखेर ७९९ प्रकरणे दाखल झाले होते़ असे एकुण ३ हजार ६६८ प्रस्ताव होते़ त्यापैकी १ हजार ३५० वैद्य ठरले तर इतर कारणांनी ६०० प्रमाणपत्र निकाली काढण्यात आले़ सध्या १ हजार ७१८ प्रमाणपत्रे प्रलंबीत आहेत़ सेवांतर्गत विभागातील २१० प्रकरणे, निवडणूक ३६, जाती दाखल्याची अपील प्रकरणे २, सेवापूर्व ४, तक्रार प्र्रकरणे १ व इतर ४२ प्रकरणे असे मिळून एकुण २ हजार २२ प्रकरणे प्रलंबित आहेत़ दरम्यान, ३० जुलै २०११ ते ३१ आॅगस्ट २०१२ या कालावधीत निर्गमित केलेल्या जात वैद्यता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याबाबत आदेश देण्यात आल्यामुळे या प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू असल्याची माहिती संशोधन अधिकारी ए़ बी़ कुंभारगावे यांनी दिली़
नांदेडसह हिंगोली, परभणी, वाशिमचा कारभार
नांदेडच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांकडून पडताळणीचे काम सुरू आहे़ या कार्यालयातील आयुक्तांकडे परभणी, हिंगोली, वाशिम व नांदेड या चार जिल्ह्याचा पदभार आहे़ तर हिंगोलीचे मुळपद असलेल्या उपायुक्तांकडे परभणी, नांदेडचे अतिरिक्त पद देण्यात आले आहे़