मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर
By प्रसाद आर्वीकर | Published: March 7, 2024 04:41 PM2024-03-07T16:41:46+5:302024-03-07T17:51:30+5:30
मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.
- संतोष गाढे
मुदखेड : तालुक्यातील मेंढका येथे बुधवारी रात्री भगर खाल्ल्याने १८ जणांना विषबाधा झाली असून, या रुग्णांवर मुदखेड व नांदेड येथे उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर एकादशी असल्याने अनेकांनी उपवास धरला होता. रात्री उपवासाच्या जेवणात भगर खाल्ली अन् काही वेळाने येथील १९ जणांना उलट्या, पोटदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले असून, त्यांचीही प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या रुग्णांवर उपचार
मेंढका येथील मारोती दासरे, रमेश वसुरे, निकिता मुनूरे, मुंजूषा दासरे, कुसुमबाई चुकेवाड, लक्ष्मीबाई वसुरे, सारीका बाराटे, सुचीता बाराटे, सुरेखा वसुरे, शीला वसुरे, मारोती वसुरे यांची प्रकृती स्थीर असून, त्याना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे, असे डॉ.संजय कदम यांनी सांगितले. तर विश्वनाथ मनूरे, माधव दासरे, इंदुबाई मनूरे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले असून, त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. डॉ.संजय कदम, डॉ.गायत्री राठोड, आधिपरिचारक रवि गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
स्वच्छता राखावी
नागरिकांनी उपवासाच्या काळात फळे स्वच्छ धुऊन तसेच उपवासाचे पदार्थ योग्य प्रकारे शिजवून खावेत.
- डॉ.आर. एस. बुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी. मुदखेड.