नांदेड विभागात २० लाख मे. टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:34 AM2018-12-06T00:34:11+5:302018-12-06T00:37:01+5:30
नांदेड विभागात ३० कारखान्यांद्वारे सुमारे २० लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून यंदाही मागील वर्षीप्रमाणेच विक्रमी गाळपाची शक्यता आहे.
नांदेड : नांदेड विभागात ३० कारखान्यांद्वारे सुमारे २० लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले असून यंदाही मागील वर्षीप्रमाणेच विक्रमी गाळपाची शक्यता आहे. पुढील वर्षी मात्र अत्यल्प पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१४ ते १७ या तीन वर्षांत मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यामुळेच २०१६-१७ यावर्षी मराठवाड्यात केवळ ०.९३ लाख हेक्टर एवढीच ऊसलागवड झाली होती. २०१७ च्या पावसाळ्यात मराठवाड्यात दमदार पाऊस झाल्याने उसाच्या क्षेत्रामध्येही तब्बल ५६.५४ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळेच २०१७ मध्ये २.१४ लाख हेक्टरवर ऊस लागवड पोहोचली होती. यंदा नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूरसह नांदेड जिल्ह्यातील ३६ कारखान्यांनी गाळपासाठी प्रस्ताव पाठविले होते. त्यातील ३० कारखाने सुरू झाले आहेत. सद्य:स्थितीत या कारखान्यांकडून १७ लाख ८० हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादनही झाले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत गाळप जोमात राहील. त्यानंतरही ऊस शिल्लक राहिल्यास मार्च अखेरपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू राहील. मात्र मार्चमध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागल्यानंतर गाळप झाले तरी रिकव्हरी कमी होण्याची शक्यता आहे. यंदा ऊस कारखानदारी जोमात असली तरी यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका या कारखानदारीला पुढील वर्षी सोसावा लागणार आहे.
मराठवाड्यात यंदा बहुतेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने पाठ फिरविली आहे. अपुऱ्या पावसामुळे डिसेंबर महिन्यापासूनच जमिनीतील पाणीपातळी घटत चालली आहे. पाण्याबरोबरच विजेच्या कमतरतेमुळे शेतकरी असहाय्य झाल्याने तो ऊस लागवडी पासून दूर जाण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी मराठवाड्यातील साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. याबरोबरच काही भागात ऊसाच्या मुळावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी मराठवाड्यातील साखर उत्पादनावर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
- २०१६-१७ मध्ये नांदेड विभागातील ५ जिल्ह्यात १० लाख ६३ हजार ९५७ मे. टन एवढे गाळप झाले होते. तर २०१७-१८ मध्ये १ कोटी १८ लाख मे. टन गाळपाजवळ कारखाने पोहोचले होते. आणि १ कोटी २५ लाखाहून अधिक क्विंटल उत्पान झाले होते. यंदाही कारखान्यांची त्याच दिशेने घोडदौड सुरू आहे.