सफाई कामगार महिलेकडून २ हजारांची लाच घेतली; स्वच्छता निरीक्षक जाळ्यात
By अविनाश पाईकराव | Published: October 1, 2024 05:13 PM2024-10-01T17:13:10+5:302024-10-01T17:13:24+5:30
पूर्ण महिन्याचा पगार देण्यासाठी मागितली ५ हजार रुपयांची लाच
नांदेड : वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार असलेल्या महिलेकडून २ हजारांची लाच स्वीकारणारा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक-१ येथील स्वच्छता निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
तक्रारदार महिला महापालिकेच्या खासगी कंत्राटदाराकडे कंत्राटी सफाई कामगार म्हणून कामाला आहे. या कामगारावर देखरेख करण्यासाठी महापालिकेकडून एक स्वच्छता निरीक्षक नेमलेला असतो. तक्रारदार महिलेने माहे ऑगस्ट-२०२४ मध्ये पूर्ण महिनाभर काम केल्याने पूर्ण पगार मिळाला. त्यानंतर यातील आरोपी स्वच्छता निरीक्षक अखबर खान उस्मानखान ( वय ४७, रा.लालवाडी, नांदेड) याने तक्रारदार महिला सफाई कामगारास तुझे २५ दिवसांचे खाडे झाले आहेत. तू मला ५ हजार रूपये दे, नाही तर मी चालू महिन्यात तुझे २५ दिवसाचे खाडे टाकतो असे म्हणून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ४ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर याबाबत सदर महिलेने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून १ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यात शहरातील चैतन्य नगर येथे लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता २००० रुपये स्वतःच्या दुचाकीच्या कव्हरमध्ये ठेवण्याचे सांगून, इशारा करून लाच स्वीकारली. आरोपी स्वच्छता निरीक्षक अखबर खान उस्मानखान यास पथकाने ताब्यात घेतले असून, या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोह शेख रसुल, किरण कणसे, राजेश राठोड, चालक पोना प्रकाश मामुलवार आदींच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील रकमेत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.