अवैध दारूविक्रीचे २१ गुन्हे
By Admin | Published: July 17, 2017 12:29 AM2017-07-17T00:29:51+5:302017-07-17T00:32:48+5:30
नांदेड: राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ व १५ जुलै रोजी विशेष मोहीम राबवून २१ गुन्हे दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचे वाढते प्रमाण पाहता दारूविक्री विरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ व १५ जुलै रोजी विशेष मोहीम राबवून २१ गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू असल्याचे गत महिनाभरातील धाडसत्रावरुन स्पष्ट होत आहे. पोलीस अधीक्षकांचे हे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी दररोज कुठे ना कुठे धाड टाकत आहेत. याच अवैध दारूविक्री प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीही राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाला जाग आली़ त्यात १४ व १५ जुलै रोजी हदगाव परिसर, लोहा परिसर, नायगाव, पिंपळगाव, देगलूर, तमलूर, नरंगल, भोकर परिसर, चिकाळातांडा व मुदखेड, बिजेलवाडी तांडा, हाणेगाव या ठिकाणी धाडी टाकून २१ गुन्हे दाखल करण्यात आले.
या मोहिमेत ७२ लिटर देशीदारू, ९४ लिटर हातभट्टी, ८६० लिटर रसायन व १८५ लिटर ताडी असा एकूण ५० हजार ८७२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
कारवाईत प्रभारी अधीक्षक डी.एन. चिलवंतकर, निरीक्षक एस.एस. खंडेराय, पी.ए. मुळे, एस.व्ही. पाटील, आर.एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक बी.एस. घुगे, बी.एस. मंडलवाड, पी.बी. गोणारकर, ए.एम. पठाण आदींची उपस्थिती होती.